चक्क….तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन समोरून चोरून नेली रिक्षा !

प्रतिनिधी —

 

कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त आणि चर्चेत असणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडत असतात. यामध्ये मोटरसायकल चोरी, घरफोड्या, अवैध धंदे, कत्तलखाने हे नेहमीचे चर्चेचे विषय ठरले आहेत. असे होत असताना संगमनेर शहरात सर्व काही अलबेल असल्याचे पोलिसांकडून भासवले जात असले तरी चक्क संगमनेर तहसील कार्यालय आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्या समोरूनच रिक्षा चोरून नेण्याची घटना घडली आहे.

पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय समोरून रिक्षा चोरीला कशी जाते ? हा चर्चेचा विषय झाला असून आता संगमनेर शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशनच्या आणि तहसील कार्यालयाच्या आवारात देखील बसवणे गरजेचे झाले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय समोरून जर चोऱ्या होऊ लागल्या तर सर्व सामान्य नागरिकांनी करायचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर बीजेपी कार्यालयाजवळ राहणाऱ्या संतोष नवले या रिक्षा चालकाची रिक्षा संगमनेर तहसील कार्यालयाच्या आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या भिंती लगत उभी करण्यात आलेली होती. ही रिक्षा काही दिवसापासून बंद अवस्थेत होती. ती गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्याने चक्क ढकल ढकलत चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. संतोष नवले यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

संगमनेर शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठे आहे. तसेच सोन साखळ्या चोऱ्यांचे, एकाच दिवशी एकाच रात्री पाच-साठ ठिकाणी चोऱ्या झाल्याचे पण प्रकार घडले आहे. एटीएम फोडण्याचे प्रकार तर सर्रास होतात. शहरातले अवैध धंदे आणि बेकायदेशीर गोवंश कत्तलखाने हे जिल्ह्यात कुप्रसिद्ध म्हणून समजले जातात. आता चक्क पोलीस स्टेशन समोरूनच गाड्यांची चोरी होऊ लागल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा उलट चर्चा सुरू झाली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!