गोवंश हत्या करणारे दोघेजण तडीपार !
प्रतिनिधी —
महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा असताना गोवंश जनावरे चोरून आणून त्यांची हत्या करून त्यांचे मांस विक्री करणे, त्यांची वाहतूक करणे असे अनेक गुन्हे दाखल असलेले संगमनेर शहरातील दोघे सराईत गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षाच्या मुदती करिता संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांनी हद्दपार केले आहेत. तसे आदेश दि. ७/९/२०२२ रोजी बजावण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नवाज जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर शहर, जिल्हा अहमदनगर) आणि अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर शहर, जिल्हा अहमदनगर) या दोघा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यामधून नेहमीच गोवंश हत्या होत असते. या गोवंश हत्येचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा उमटलेले आहेत. शेकडो वेळा कारवाई करूनही गोवंश हत्या थांबत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने कारवाया होत असतात. हत्या करणारे आरोपी हे सरावलेले असून त्यांच्यावर मोठी कारवाई होणे गरजेचे आहे. अनेक आरोपींपैकी दोघाजणांना तडीपार केल्यानंतर गोवंश हत्यांना आळा बसतो काय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार नवाज जावेद कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा गुन्हेगार आरोपी अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी याच्याविरुद्ध तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. एवढे गुन्हे दाखल होऊनही गुन्हेगार गोवंश हत्या करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही असे दिसून येत आहे. या दोघांनाही एक वर्षाच्या मुदती करिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

