अकोले तालुका छुप्या अवैध सावकारशाहीच्या विळख्यात !

प्रतिनिधी —

स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारशाहीच्या विरोध येथील चळवळीच्या मातीने बंड पुकारले, सावकारकी नष्ट व्हावी म्हणून सहकारी सोसायट्या – सहकारी पतसंस्था यांचे जाळे उदयास आले. दोनशे – तीनशे कोटींच्या ठेवी असलेल्या पतसंस्था तालुक्यात आहेत. सावकारांच्या जाचाला कंटाळून तालुक्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. तरी देखील तालुका छुप्या सावकारकीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.

 

या सावकारांची मुजोरी मोडीत काढण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. व्हाईट काॅलर तरूणाई या सावकारकीत अडकून पडल्याचे दिसत आहे. दरम्यान अश्या छुप्या सावकारकीच्या कुणी पुराव्यानीशी तक्रार केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उचलू असा इशारा सहकार सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिला आहे.

 

आपल्या दैनंदिन जीवनात संसाराचा गाढा ओढताना, वाढत्या महागाईला तोंड देताना गरज सरेल म्हणून अक्षरशः धुणीभांडी, शेतमजुरी, कचरा वेचणाऱ्या महिलांपासून अनेक शेतकरी, व्यापारी अन् काही लहान-मोठे उद्योजकही खासगी सावकारांकडून कर्जाऊ पैसे घेतात. मात्र, त्यांच्या व्याजाचा टक्का इतका मोठा असतो की, कर्जदार त्यातच पुरते फसतात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही.

अखेर काहीजण कर्जबाजारीपणाला व सावकाराच्या तगाद्यांना दादागिरी, धमकावणे आणि बदनामीला कंटाळून मृत्यूला कवटाळतात. काहींना सावकाराकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या घटना अलिकडच्या काळात अकोले व राजूर परिसरात घडत आहेत.

अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली करून कर्जदारांची पिळवणूक केली जाते. ५ टक्क्यांपासून चक्क १५ ते २० टक्क्यांपर्यंत हे सावकार व्याजाची आकारणी करतात. रक्कम वसुलीसाठी काही सावकारांकडून महिलांसह गुंड प्रवृत्तीचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.

 

किरकोळ विक्रेत्याला सकाळी ५०० रुपये व्यवसायाला दिले की, रात्री ६०० रुपये गोळा करणारेही काही महाभाग दिसतात. भिशी, लिलाव भिशी आदी माध्यमातूनही खासगी सावकारकी फोफावली आहे.

कोरे धनादेश घेणे, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेणे, वाहन, मौल्यवान वस्तू ताब्यात घेऊन व्यावसायिक वापर करणे, सोन्याचे दागिने घेणे, खासगी भिशीच्या आडून सावकारी, कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनीचे वेळप्रसंगी खरेदीखत होताना दिसते.

खासगी सावकारशाहीने तालुक्यातील लोक हैराण झालेत. सहकार खात्याकडील अधिकृत माहितीनुसार तालुक्यात केवळ ८ परवानाधारक सावकार आहेत. परवानाप्राप्त सावकारी कर्जाचा व्याजदर दसादशे १२ टक्के असतो. मात्र, खासगी सावकारांकडून दरमहा दर शेकडा ५ ते १५ टक्क्यांपर्यंत म्हणजे दसादशे ६० ते १८० टक्के व्याजाने आकारणी करून पिळवणूक केली जाते. या छुप्या अवैध सावकारकिला आळा घालणार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!