स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी अनेक धरणांची निर्मिती केली — नवले
प्रतिनिधी —
स्वातंत्र्य सेनानी माजी मंत्री स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी पाटबंधारे मंत्री असताना राज्यात अनेक धरणांची निर्मिती करून लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचे नंदनवन केले. हे सर्व काम नि:स्पृहपणे करताना त्यांनी कधीच स्वार्थाचा लवलेशही लागू दिला नाही. असे गौरवोद्गार अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी काढले आहेत.

स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री, थोर विचारवंत डॉ. बी. जे. खताळ पाटील यांची ३ री पुण्यतिथी संगमनेर येथे साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना प्रमुख व्याख्याते मधुकर नवले यांनी वरील गौरव उद्गार काढले. योगवर्धीनी संगमनेरचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मधुकर नवले यांनी बी. जे खताळ पाटलांचा जीवनपट उलगडून सांगितला. ते म्हणाले, खताळ पाटलांचे काम हे निष्पृह होते. सहकार, शिक्षण, विविध संस्था यांची पायाभरणी करतांना दादांनी कधीही स्वार्थाचा लवलेश लागू दिला नाही. ज्या संस्थांची निर्मिती केली त्या सर्व लोकांच्या मालकीच्या केल्या.

नवले पुढे बोलताना म्हणाले की, खताळ पाटील पाठबंधारे मंत्री असताना त्यांनी अनेक धरणांची निर्मिती करुन लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले व अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचे नंदनवन केले. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण केला. एक युगपुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितले पाहिजे.

ते पक्के इंदिरा काँग्रेस विचाराचे असले तरी सध्या अस्तित्वात आसलेल्या गाडीतल्या आणि माडीतली काँग्रेस त्यांना मान्य नाही. घरणेशाही तर त्यांना मुळीच मान्य नव्हती. असा निष्कलंक राजकारणी, निष्णात वकील, १०० व्या वर्षी ६ पुस्तक लिहिलेला लेखक होणे नाही.

या प्रसंगी माजी प्राचार्य सहदेव चौधरी, ज्ञानेश्वर गोंटे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष साहेबराव वलवे, विठ्ठलराव शेवाळे, वसंतराव देशमुख, विक्रमसिंह खताळ पाटिल, रावसाहेब डूबे, भास्करराव पाटील खताळ आदि उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पेटकर यांनी खताळ पाटिल हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. माझ्या सारख्या एका शिपायाच्या मुलाला डॉक्टर केले. अशा अनेक मुलांना त्याकाळात जीवनात उभे करण्याचे काम त्यांनी केले. नियम आणि कायदे तोडून कोणतेच काम करायचे नाही हे त्यांचे तत्व खरे लोकशाही मूल्य जोपासणारे होते. सत्तेचा फायदा त्यांनी कधीच स्वतःला व कुटुंबाला घेतला नाही. सत्ता ही जनकल्यानासाठी असते हे त्यांचे ठाम मत होते.

पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्य सेनानी माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील समितीने केले होते. सतिष कानवडे, शरद पावबाके, वैभव लांडगे, रावसाहेब डूबे, रंगनाथ कोकणे, दत्तात्रय कोकणे, उपसरपंच संदीप ठोंबरे, सागर कानवडे आदि उपस्थित होते.

