गणेश विसर्जन मिरवणुकीत “२४ तास ऑन ड्युटी” असणाऱ्या पोलिसांना उम्मत फाउंडेशनने पुरवला पौष्टिक नाष्टा !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणेश विसर्जन मिरवणूकही देखील जोरात आणि तेवढीच उत्साहात पार पडली. तब्बल १८ ते १९ तास चाललेली ही मिरवणूक शांततेत पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आणि रात्रभर जागे राहणारे पोलीस आणि प्रशासन यासाठी कारणीभूत होते. मिरवणुकीत सर्वांनी ढोल ताशे डीजेच्या गाण्याचा स्वरांचा आनंद लुटला. सर्वजण आपापल्या मंडळांच्या सेवेत सहभागी झालेले होते. कार्यकर्ते एकमेकांचे काळजी घेत होते.

त्याचवेळी दुसरीकडे “२४ तास ऑन ड्युटी” असलेल्या पोलीस दलातील महिला पुरुष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील उम्मत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दिवसभर आणि रात्री एकाच ठिकाणी उभे राहून बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाष्टा देण्याची सोय केली त्यांना नाष्टा पुरावाला, पाणी पुरवले आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वसीम भाई शेख आणि उम्मत फाउंडेशन चे मुजीब खान (लालाभाई) यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतांना बंदोबस्तासाठी असलेले स्थानिक आणि बाहेरगावा वरुन आलेले पोलीस कर्मचारी दिवसभर ड्युटीवर असताना उम्मत फाउंडेशन संगमनेरच्या वतीने पौष्टिक “राजगीरा लाडू, शेंगदाणा चिक्की व हल्दीराम चिवडा” सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करून गणेशोत्सवात सहभाग घेतला.

सर्वांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न या तरुणांनी आणि फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी माझे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यादेखील उपस्थित होत्या.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

