बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबीयांचे आमदार थोरातांकडून सांत्वन
प्रतिनिधी —
आपल्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मयत झालेल्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले असून मेंगाळ कुटुंबीयांना शासनाची मदत तातडीने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मेंगाळवाडी येथे मेंगाळ व कातोरे कुटुंबीयांची आमदार थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला मीराबाई रामभाऊ मेंगाळ या मयत झाल्या. तर शेजारीच असलेल्या जिजाबाई वसंत कातोरे या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही कुटुंबांची आमदार थोरात यांनी भेट घेतली. यावेळी मिलिंद कानवडे, सोमनाथ गोडसे, बाळासाहेब कानवडे, मधुकर कानवडे, लक्ष्मण मेंगाळ, गेनू मेंगाळ, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे, वन परिक्षेत्रपाल लोंढे, संगीता कोंढार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार थोरात यांनी मेंगाळ कुटुंबीयांचे सांत्वन करून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून मेंगाळ कुटुंबीयांना वीस लाखाची मदत व गोपीनाथ मुंडे अपघात योजनेअंतर्गत दोन लाखाची मदत मिळून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये या कुटुंबीयांना मदतीचा चेक दिले जातील असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

आमदार थोरात म्हणाले की, डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या या माता भगिनी असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा. नागरिकांनीही या वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जिजाबाई वसंत कातोरे यांची यांची विचारपूस आमदार थोरात यांनी केली असून त्यांनाही तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचना वनविभाग व प्रशासनाला केल्या आहेत. मेंगाळवाडी ,सावरचोळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

