सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कारांचे २३ सप्टेंबर रोजी वितरण !
तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रतिनिधी —
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (२३ सप्टेंबर) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री विधिमंडळाचे पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार डॉ सुधीर तांबे यांनी दिली.

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला जयंती महोत्सव समारंभ २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून ‘डॉ. आ. ह. साळुंखे’ यांना ‘स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’, ‘डॉ. सुधीर भोंगळे’ यांना ‘डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ आणि माजी मंत्री मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ‘दिलीपराव देशमुख’ यांना ‘सहकारातील नेतृत्व’ पुरस्काराने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याशिवाय जयंती महोत्सवानिमित्त शनिवारी (24 सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजता माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सोबतच संगमनेरकरांना कीर्तनकारांची ‘किर्तन जुगलबंदी’ अनुभवण्यास मिळेल. सायंकाळी सात वाजता ‘युवा जल्लोष धमाका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी साडेबारा वाजता ‘घे भरारी स्पर्धा परीक्षा तयारी संवाद’ होणार असून सायंकाळी सात वाजता मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांचा सहभाग असलेला लोकप्रिय ‘हास्य जत्रा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेरकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव समिती आणि अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुरस्कार निवड समितीमध्ये विजय अण्णा बोराडे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, केशवराव जाधव, प्राध्यापक बाबा खरात यांचा समावेश होता. या समितीने पुरस्कारांची निवड केली आहे. या वर्षाच्या पुरस्कारार्थीमध्ये आ. ह. साळुंखे, डॉ. सुधीर भोंगळे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली.

