भारत जोडो यात्रेमुळे केंद्र सरकार हादरले आहे — अशोक गेहलोत
महाराष्ट्र ही संत व समाजसुधारकांची भूमी
स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून समाज प्रबोधनाचा मंत्र दिला — छगन भुजबळ
प्रतिनिधी —
महाराष्ट्र ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दिली असून सहकारातून ग्रामीण भागात समृद्धी निर्माण करण्यात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून सर्वधर्मसमभाव व लोकशाही विचार जपणाऱ्या काँग्रेसमुळे समृद्ध भारताची उभारणी झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे मोठा जनाधार असलेले लोकनेते असून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याअगोदरचा संगमनेरच्या सहकार पंढरीतील कार्यक्रम हा शुभसंकेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे आणि त्या यात्रेला मिळत असलेल्या अबूतपूर्व प्रतिसादामुळे केंद्र सरकार अक्षरशा हादरले असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

यशोधन कार्यालयाजवळ शेतकी संघाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ हे होते. तर व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार उल्हास दादा पवार, सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, कांचन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, शरयु देशमुख, डॉ. जयश्री थोरात, माधव कानवडे ,बाजीराव खेमनर, सेवा दलाचे प्रांताध्यक्ष विलास औताडे, शरद आहेर, करण ससाने, डॉ. राजीव शिंदे, दिलीप शिंदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल आहेर, कल्याण काळे, राजेंद्र दादा नागवडे, उदयसिंह उंडाळकर ,सचिन गुजर, प्रताप शेळके, संपत मस्के, त्रिंबक भिसे, हेमंत ओगले, बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ आ.ह. साळुंखे यांना, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने डॉ. सुधीर भोंगळे यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना गौरवण्यात आले. एक लाख रुपये रोख ,सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .

अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेवर आधारित आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात देश उभा केला आहे. आज भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जातो ती काँग्रेसची देण आहे. मात्र सध्या काहीजण जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये सरकार बदखास्त केली जात आहेत.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग या जातीयवादी शक्तींनी केला आहे. सध्या देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक, पत्रकार, विचारवंत यांना कैद केले जात आहे. या हुकूमशाही विरुद्ध काँग्रेस हा पक्ष लढतो आहे. काँग्रेसला मोठी परंपरा असून कितीही संकटे आली तरी काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार आहे. भारत जोडो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून केंद्रीय सरकार राहुल गांधी यांच्या या आंदोलनाला घाबरले आहे. महाराष्ट्राने सहकार ही मौलिक देन देशाला दिली असून भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार छगन भुजबळ म्हणाले की, काँग्रेस हा त्याग व बलिदान असलेल्या पक्ष आहे. अकरा वर्ष जेलमध्ये राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आयआयटी, एम्स, विविध धरणें या सारखी पायाभूत सुविधा करून देशाला एक लौकीक प्राप्त करून दिला. मात्र सध्या जातीयवादी सरकार सत्तेवर आले आहे. भाजपा हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. समतेचा विचार व लोकशाही टिकवायची असेल तर या जातीवादी शक्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. थोरात व शिंदे या विचारवंतांनी समाज प्रबोधनाचा मंत्र सहकारातून दिला. तो संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे. काँग्रेस हा पुरोगामी पक्ष असून या पक्षाची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. म्हणून भाजप काँग्रेसला घाबरत असल्याची टीकाही त्यांनी केली

तर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या समृद्धीचा पाया घातला तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणल देशाला हरित क्रांतीचा मंत्र दिला. या दोन महान विभूतींच्यामुळे हा प्रदेश सुपीक झाला असून त्यांचे विचारांवर आपली वाटचाल सुरू आहे .

यावेळी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग डोटासरा, ज्येष्ठ विचारवंत डॉ आ.ह. साळुंखे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, डॉ सुधीर भोंगळे यांचीही भाषणे झाली.
दिलीपराव देशमुख यांनी बक्षिसाची रक्कम संग्राम मूकबधिर विद्यालयाला दिली
लातूर जिल्ह्यातील सहकारातील मोठे नेतृत्व दिलीपराव देशमुख यांना सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेला एक लाख रुपयांच्या पुरस्काराची रक्कम व यामध्ये अधिक चार लाख रुपये टाकून एकूण पाच लाख रुपये ही रक्कम संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयास दिली आहे.
स्वागत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. प्रास्ताविक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबा ओहोळ यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातून व राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक महिला व युवक यांची मोठी उपस्थिती होती.

