उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन साजरा !
दंडकारण्य अभियान !
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्तर महाराष्ट्रातील ५४ जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांवर देत हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती यशोधन जनसंपर्क कार्याकडून देण्यात आली आहे.

संगमनेर मधील शिवाजीनगर येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत तर नाशिक येथे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सत्यजित तांबे, शरयु देशमुख, डॉ.जयश्री थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अहमदनगर,नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील ५४ तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले. याच बरोबर त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली.

ग्लोबल वार्मिंग च्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली दंडकारण्य अभियान हे खऱ्या अर्थाने लोकचळवळ ठरली आहे. अभियानाचे हे सतरावे वर्ष असून यावर्षी दुर्गा तांबे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ५४ तालुक्यांमध्ये वृक्ष संवर्धन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. खानदेशातील सातपुडा पर्वत ते सह्याद्री पर्वत यादरम्यान प्रत्येक तालुक्यामध्ये, गावागावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

थोरात म्हणाले की, दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याने संपूर्ण राज्याला वृक्ष संवर्धनाची संस्कृती दिली आहे. मागील सोळा वर्षात झालेल्या कामांमुळे उघडी बोडके डोंगर हिरवेगार दिसू लागले आहेत. प्रत्येकाला आता पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. कोरोना संकट, ऑक्सिजनचे संकट या काळात वृक्षारोपण व संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकाने समजून घेतले आहे. आगामी काळामध्ये प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षरोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. खरे तर पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाने मूलभूत कर्तव्य मानून काम केले पाहिजे. भावी पिढ्यांच्या रक्षणाकरता व सजीव सृष्टी करता प्रत्येकाने या पर्यावरण रक्षणाच्या अभियानात सहभाग घ्यावे असेही ते म्हणाले.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, अंमळनेर, चाळीसगाव, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, भडगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात नवापूर, साक्री, दोंडाईचा, नाशिक जिल्ह्यात सासवड, सटाणा ,बागलाण, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, अकोले, पारनेर यासह विविध तालुक्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
