‘मी एक तारा’ अभियानातून राज्यातील युवतींना संशोधनासाठी प्रोत्साहन — आमदार डॉ सुधीर तांबे

जयहिंद लोक चळवळ चा उपक्रम

 प्रतिनिधी —

भारताला अनेक कर्तुत्ववान व प्रेरणादायी महिलांचा उज्वल इतिहास आहे. या महिलांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन सध्याच्या तरुणी आपापले करियर यशस्वी करत आहेत. अठराव्या शतकात स्त्री पुरुष समानतेसाठी झटणाऱ्या ताराबाई शिंदे यांचा आदर्श डोळ्यासमोर राज्यातील तरुणींना शास्त्रज्ञ होण्यासाठी जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून “मी एक तारा २०२२” या अभियानामुळे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात जयहिंद महिला मंचच्या वतीने आयोजित ‘मी एक तारा २०२२’ च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जयश्री थोरात तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉ. स्मिता पानसरे, जयहिंद लोकचळवळीच्या समन्वयक उत्कर्षा रुपवते, निर्मलाताई गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर, प्रमिलाताई अभंग आदी उपस्थित होत्या.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिराजी गांधी यासारख्या अनेक महान व कर्तुत्वान महिलांचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. या महिलांचा आदर्श घेऊनच सध्याच्या मुली आपले करिअर यशस्वी करत आहेत. आठराव्या शतकामध्ये बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी मोठा लढा दिला. त्या काळात समानतेचा विचार घेऊन काम करणे ही मोठी क्रांती होती. आणि ती ताराबाई शिंदे यांनी केली. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर घेऊन जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यातील युवतींना संशोधन करण्यासाठी व शास्त्रज्ञ होण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले जाणार आहे.

‘मी एक तारा’ या अभियानांतर्गत या युवती स्वतःच तेजोमय होऊन इतरांना प्रकाशित करतील आणि त्यांच्या ज्ञानाचा व संशोधनाचा देशाला व राज्याला नक्की फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात व तालुक्यात खेडोपाडी २ हजार २०० बचतगटांचे जाळे निर्माण केले आहे. तालुक्यात महिलांचे संघटन मोठे असून महिला सबलीकरण यशस्वीपणे राबविले आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद लोकचळवळ आयोजित ‘मी एक तारा’ युवती सक्षमीकरण अभियान २०२२ हे राज्यातील युवतींसाठी मोठी संधी असल्याचे त्या म्हणाल्या.

दुर्गा तांबे म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने महिला सबलीकरणासाठी काम करत आहोत. या पुढील काळात महिलांचे आरोग्य हे चांगले राहणे गरजेचे आहे. कुटुंबाच्या आरोग्याबरोबर समाजाचे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाल्या.

कॉम्रेड स्मिता पानसरे म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचा तालुका आहे. महिलांना या ठिकाणी मोठी संधी मिळत आहे. जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांना शास्त्रज्ञ होण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार असून याचा फायदा नक्कीच राज्यातील युवतींना होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य महिला आयोग सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी केले. सूत्रसंचालन सूनिता कांदळकर यांनी केले आभार सौदामिनी कान्होरे यांनी मानले.

यावेळी जयहिंद लोकचळवळ ग्लोबल प्रमुख सूरज गवांदे, समन्वयक संकेत मुनोत, विभाग प्रमुख डॉ. अभयसिंह जोंधळे, मिलिंद औटी, एम वाय दिघे , अनंत शिंदे उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!