शिक्षकांची वाचन संस्कृती नष्ट होत आहे — उत्तम कांबळे

 

वेतन आयोग मिळाला तरी पुस्तक खरेदी करण्याची ऐपत उंचावण्याची गरज

 

प्रतिनिधी —

शिक्षकांची वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे त्यामुळे व्यवस्था कोमात जात आहे. शिक्षकांनी वाचन संस्कृती जोपासली नाही तर समाज निरक्षर होत जाईल. त्यामुळे वेतन आयोग मिळाला तरी पुस्तक खरेदी करण्याची ऐपत उंचावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

प्रवरानगर येथील पोपट काळे लिखित काजवा या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन आवर्जुन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या कार्यस्‍थळावर जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनी विखे पाटील यांच्‍या विशेष उपस्थितीत करण्‍यात आले. माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सहसंचालक रमाकांत काटमोरे, मनोविकास प्रकाशनचे पाटकर आदी उपस्थित होते.

कांबळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, अलीकडे शिक्षक वाचत नाही. शिक्षकांचा समाजमनावर अजूनही पगडा आहे. त्यांच्याबद्दल समाजात असलेले स्थान सर्वोच्च आहे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःला जपायला हवे. महाराष्ट्रात १५ कोटी लोकसंख्या आहे, त्यातील पाच कोटी लोकांची पुस्तक विकत घेण्याची क्षमता आहेत. तरीसुद्धा पाचशे प्रती विकल्या जात नाहीत याबद्दल त्‍यांनी खंत व्यक्त केली. आपण पुस्तकाच बोट सोडल तर समाजाचा ऱ्हास जवळ आला असे समजावे. त्‍यामुळेच गायकाने रियाझ केला पाहीजे, तसेच लेखकाने लिहीत राहायला पाहीजे असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

काजवा या शब्‍दबध्‍द झालेल्‍या आत्‍मचरित्राचे कौतुक करुन, उत्‍तम कांबळे म्‍हणाले की, समाज मनावर परिणाम करणारी ही साहीत्‍यकृती आहे. जगात साहित्‍याने समाजात बदल घडविण्‍यात आत्‍मकथनांची भूमिका खुप मोठी आहे असे सांगतानाच लेखक पोपट काळे यांनी दुःखाचे भांडवल त्यांनी केले नाही. आज छोट्या माणसांच्‍या सावल्‍या ज्‍यावेळी पडू लागल्‍यास तेव्‍हा अंधार पडणार असल्‍याची जाणीव होते. मुल्‍य रांगायला लागतात आणि पणतीचाही ज्‍यावेळी अभाव असतो तेव्‍हा छोटा जीव काजव्‍याच्‍या रुपाने धावून येतो आणि मी उजेडाचा दुत आहे. अंधारा नंतर उजेड येणार आहे असा संदेश देतो. काळेंच्‍या कांदबरीतून सुध्‍दा कायम राहत नसते हाच संदेश मिळत असल्‍याचे त्यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.

सद्य परिस्थितीच्‍या साहित्‍यावर भाष्‍य करताना कांबळे म्हणाले की, या कालखंडात आत्मकथन प्रभावीपणे होत नाहीत. चांगले प्रकाशक पुस्तकांना मिळत नाहीत. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सातत्याने नवनवीन विषयांचा शोध घेऊन पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी मात्र आवर्जुन सांगितले.

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील म्‍हणाल्‍या की, पोपटराव काळे यांचे हे आत्‍मचरित्र हे खऱ्या अर्थाने समाजाला अंतर्मुख करायला लावणार आहे. आपल्‍या आयुष्‍याची वाटचाल करताना सोसाव्‍या लागलेल्‍या समस्‍यांचे भांडवल न करता त्‍यावर मात करत त्‍यांनी जे यश मिळविले ते त्‍यांच्‍या कुटूंबाच्‍या जडणघडणीसाठी महत्‍वपूर्ण ठरले. कष्‍ट करणाऱ्या आपल्‍या आई वडीलांच्‍या साक्षीनं त्‍यांच्‍या आत्‍मचरित्राचा होत असलेला प्रशासन सोहळा आज सहकाराच्‍या भूमित होत असल्‍याचा आनंद हा खुप मोठा असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर म्हणाले की, काळे यांनी आपल्या शासकीय सेवेत असताना सातत्याने प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचे काम केले आहे. प्रत्येक काम मनापासून करणे कोणत्याही कामाला नकार न देणे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रतिबिंब या पुस्तकात प्रतिबिंबित झाले आहे. रमाकांत काटमोरे यांनी पुस्तकातील सर्वच भाग वाचनीय झाले असल्याचे सांगितले. शिक्षण परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार टपले यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षण, साहित्‍य आणि सहकार क्षेत्रातील मान्‍यवर मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

पोपटराव काळे यांचे कुटूंब हे ऊस तोडणीसाठी प्रवरानगर येथे आले होते. तिथूनच त्‍यांच्‍या आयुष्‍याची वाटचाल सुरु झाली ही आठवन ठेवून आपल्‍या आत्‍मचरित्राचे प्रकाशन सहकाराची चळवळ ज्‍या भूमीतून सुरु झाली तिथेच व्‍हावे ही त्‍यांची अपेक्षा आजच्‍या या कार्यक्रमाने पुर्ण झाली. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी आजचा हा कार्यक्रम प्रवरानगरच्‍या कामगार सांस्‍कृतीक भवनात घेतल्‍याचे पोपट काळे यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!