कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह होणार बंदिस्त !
नामदार थोरात यांच्या प्रयत्नातून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर
अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून नाट्यगृह सुसज्ज करावे – डॉ. मुटकुळे
प्रतिनिधी —
संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाच्या बंदिस्तकरण कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ८ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची देताना माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहराची विकासातून वैभवाकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मोठ – मोठ्या वैभवशाली इमारतीं सह अत्यंत सुंदर व भव्य दिव्य हायटेक बस स्थानक उभे राहिले आहे. याचबरोबर नव्याने शहराला जोडणाऱ्या चारही रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

संगमनेर शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे बंदिस्तीकरण कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारकडून ८ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवला आहे. या निधीतून संपूर्ण नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण होणार आहे. यामुळे शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दर्जेदार नाटके यांसह चांगल्या कार्यक्रमाची शहरवासीय व तालुक्यातील नागरिकांसाठी कायम मेजवानी मिळणार आहे. महसूल मंत्री थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरासाठी व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. विकासातून संपूर्ण शहर हे राज्यात मॉडेल शहर ठरले आहे. नगरपरिषदेने नागरिकांना सातत्याने चांगल्या सुविधा देण्याबरोबर स्वच्छता, निळवंडे थेट पाईपलाईन योजनेतून मुबलक व भरपूर स्वच्छ पाणी, गार्डन, गंगामाई घाट सुशोभीकरण, रस्ते, आरोग्याच्या मूलभूत सुविधा यांचेसह अनेक दर्जेदार सुविधा पुरवली आहे. यामुळे नगरपरिषदेचा सातत्याने राज्य व देश पातळीवर गौरव झाला आहे.

नुकताच नगरपालिकेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला असल्याचे त्या म्हणाल्या असून या सर्व प्रगतीमध्ये शहरातील नागरिक बंधू भगिनींचे मोठे सहकार्य मिळाले आहे.
मंत्री थोरात यांनी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहासाठी भरीव निधी मिळवल्याबद्दल संगमनेर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नाट्यप्रेमी व कलाप्रेमीनी नामदार थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून नाट्यगृह सुसज्ज करावे – डॉ. मुटकुळे
कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहा साठी राज्य शासनाकडून आठ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. याबद्दल मनस्वी आनंद तर झालाच परंतु ज्या सांस्कृतिक दृष्टीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा निधी मंजूर केला त्याबद्दल त्यांचे निश्चितच संगमनेरकर अभिनंदन व आभार मानतील.
नाट्य संगीत व नृत्य हे मानवी जीवनातील विकासातील महत्वाचे व अविभाज्य भाग आहेत मात्र कुठल्याही कलेचा विकास होणार ती जनसामान्यांपर्यंत प्रसारित करायचे असेल तर तिला राजाश्रय मिळावा लागतो तरच ती जोपासली जाते व विकसित होते कवी आनंद फंदी नाट्यगृहाचा नाविन्यपूर्ण विकास हा त्याचाच एक भाग आहे. या दृष्टिकोनातून नामदार थोरात यांनी समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासाला निश्चितच राजाश्रय दिलेला आहे.
निधी मंजूर केला मात्र तो योग्य पद्धतीने म्हणजे थिएटरचा जो आत्मा आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून उपयोग केला पाहिजे. नाटकासाठी, नृत्यासाठी किंवा संगीतासाठी ज्या ज्या गोष्टी रंगमंचावर आवश्यक आहेत त्याचा पहिल्यांदा व्यवस्थित अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून नियोजन करायला हवे. अन्यथा फक्त इमारत बंदिस्त होईल व पुन्हा अपुऱ्या सुविधा असलेले नाट्यगृह उभे राहील? यासंदर्भात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याबरोबर सखोल चर्चा झालेली आहे. त्यांना त्या संदर्भात चांगली माहितीही आहे. त्यांनी विशेष लक्ष घालून हे सर्व काम करावे अशी अपेक्षा आहे. तांबे यांची नेहमीच सांस्कृतिक चळवळीला मोलाची साथ लाभलेली आहे.
पुनश्च एकदा या दोघांचेही अभिनंदन व संगमनेरकरांच्या वतीने आभार मानतो. एका सुंदर नाट्यगृहाची निर्मिती ते निश्चितच करतील अशी अपेक्षा बाळगतो.
डॉ. सोमनाथ मुटकुळे
ज्येष्ठ लेखक, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक

