भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले आहेत — आ. राधाकृष्ण विखे पाटील

कुणाच्याही दबावाला बळी पडू नका.

केंद्राच्या निधीवर उड्या मारुन श्रेय लाटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

नाव न घेता महसूल मंत्र्यांवर जोरदार टीका….

 

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले आहेत. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. न झालेल्या कामाचे प्रश्न गावात खंबीरपणे उभे राहून विचारा. कारण आजपर्यंत केंद्र सरकारने या तालुक्यासाठी १२७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. राज्यसरकारचा याच्याशी कोणताही संबंध नाही. केवळ केंद्राच्या निधीवर उड्या मारुन श्रेय लाटण्याचे प्रकार सुरु झाले असल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

 

केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शक्तीकेंद्रपमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यात विखे पाटील यांनी तालुक्यातील पक्षसंघटनेचा आढावा घेतानाच सर्व शक्तीकेंद्रप्रमुख आणि बुथप्रमुखांना आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बूथप्रमुख म्हणून करावयाच्या कामांच्या मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, जावेद जहागीरदार, सतिष कानवडे, राम जाजू, श्रीराज डेरे, सुधाकर गुंजाळ, हरीष चकोर, मेघा भगत, सुनिता कानवडे, सुदामराव सानप, डॉ.सोमनाथ कानवडे, वैभव लांडगे, यांच्यासह पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी तळेगाव येथील माजी उपसभापती नामेदव दादा दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे जेष्ठनेते डिग्रस गावचे सरपंच रखमाजी पा.खेमनर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

संगमनेर तालुक्यात केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून १२७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतू याचे श्रेय महाविकास आघाडी सरकारचे कार्यकर्ते घेत आहेत. ज्यांनी कोव्हिड संकटात संपूर्ण तालुका वाऱ्यावर सोडून दिला होता. तेच आता मोदी सरकारच्या लसीकरणाचे श्रेय घेत फिरत आहेत. संगमनेर तालुका राज्यात नेमका कोणत्या विषयात पुढे आहे वाळू माफीया, लॅण्डमाफीयांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. प्रदुषित पाणी पाजण्यामध्येही संगमनेर तालुका प्रथम क्रमांक समजायचा का? असा खोचक सवाल करुन विखे पाटील यांनी केला. आता तालुक्यात भोकाडी दाखवायचे दिवस संपले आहेत. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. गावागावामध्ये खंबीरपणे उभे राहून न केलेल्या कामांचे उत्तरही मागा असे आवाहन करुन आपल्याला गावपातळीवर सक्षमपणे बूथप्रमुख उभे करायचे आहेत. दबावाला बळी पडणारे कार्यकर्ते नकोत असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

 

आपल्या भाषणात विखे पाटील म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनसामान्यांसाठी ७८ योजना सुरु केल्या आहेत. कोव्हीड संकटातही केंद्राने राज्याला मदत केली. त्यामुळे आपला देश आत्मनिर्भरतेने पुन्हा उभा राहिला आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण देशभरात सुरु आहे. पंरतू या योजनांचे समाजमाध्यमात मार्केटींग आपण कमी पडत असल्याची खंत व्यक्त करुन तयांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार रोज नवा विषय निर्माण करुन, जनतेला गुंतवून ठेवण्याचे काम करत आहे. कार्यकर्तेही सोशल मिडीयावर या विषयावर टिका टिपन्नी करण्यात व्यस्त होतात. त्यामुळे केंद्रसरकारच्या योजनांचे श्रेय घेता येत नाही. यामध्ये बदल करुन येणाऱ्या काळात गावागावात जावून बूथ कमिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे काम आणि दिलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे त्यांनी सूचित केले.

 

राज्यसरकार फक्त आश्वासनं देत आहे मात्र कोणत्याही घोषणांची अंमलबजावणी सरकारकडून होत नाही. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना कवडीची मदत सरकार करु शकले नाही. हे सरकार बिल्डर लॉबी धार्जिने आहे. कोव्हीड संपल्यानंतर मुद्रांक शुल्कामध्ये कपात करुन बिल्डरांना दिलासा दिला. मुंबईमधील नागरीकांना जसा कर सवलतीचा लाभ दिला तसा लाभ संगमनेरच्या व्यापारी आणि नागरीकांना इथल्या मंत्र्यांनी का मिळवून दिला नाही? ही गावे राज्यात नाहीत काय? केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्यांना सामान्य जनतेचा विसर पडला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, डॉ.अशोक इथापे श्रीराम गणपुले यांची भाषणे झाली. विविध जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी गावागावातील समस्या मांडल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!