महसूलमंत्र्यांंकडून मोधळवाडी येथील शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन
शेततळ्यात बुडून झाला होता बहिण-भावाचा मृत्यू
प्रतिनिधी —
पठार भागातील पिंपळगाव देपा अंतर्गत असलेल्या मोधळवाडी येथील शिंदे परिवारातील बहिण भाऊ यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले आहे.
मोधळवाडी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरी जाऊन थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले. सभापती शंकर खेमनर, मिरा शेटे, किरण मिंडे, जयराम ढेरंगे, ज्ञानदेव मिंडे, प्रदिप पुंड व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मोधळवाडी येथील घाणे वस्तीवर चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात असून त्यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष्य हे दोघे शेततळ्याच्या कडेला धुणे आणण्यासाठी गेले होते. यावेळी लहानग्या आयुषचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मोठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही पाण्यात बुडाली आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पठार भागात अत्यंत दुःखाचे वातावरण निर्माण झाले.
संगमनेर पठार भागात आले असता थोरात यांनी आपले महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करून मोधळवाडी येथे जाऊन या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी ते म्हणाले अशा कठीण प्रसंगातून जाताना सर्वांनी या शिंदे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे. या दुःखद प्रसंगात नव्हे तर या पुढील काळातही सर्वांनी त्यांना भक्कम आधार द्यावा. असे सांगताना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या . याप्रसंगी मोधळवाडी पिंपळगाव देपा व पठार भागातील अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ शिंदे वस्तीवर उपस्थित होते.
