मराठा आरक्षणा प्रमाणेच ओबीसीचे आरक्षण घालविण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

सरकारचे फक्त वर्क फ्राॅम जेल !
प्रतिनिधी —
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सुध्दा सरकार करू शकले नाही.मराठा आरक्षणा प्रमाणेच ओबीसीचे आरक्षण घालविण्याचे पाप या तिघाडी सरकारने केले आहे. कोणताही जनाधार नसलेल्या सरकारचे फक्त वर्क फ्राॅम जेल सुरू असल्याने या सरकारकडून कोणत्यात समाज घटकांना न्याय मिळू शकत नसल्याचा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या कारणाने शिर्डी येथील प्रांत कार्यालयाच्या समोर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या उपोषणाची सांगता विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना ओबीसी आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसीं आघाडीचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, सचिन तांबे, अशोक पवार मधुकर कोतै, विलास विनायक कोते, नरेश सुराणा, सोमराज कोते, किरण बोराडे, सुजित गोंदकर, मनोज लोढा, गजानन शेर्वेकर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टिका करून या सरकारने ओबीसी समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला दोनवेळा इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे आदेश दिले. पण सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवून वेळ मारून नेत होते. सरकारने समर्पित आयोग नेमयला हवा होता पण सरकारने त्यातही गांभीर्य दाखवले नाही. आता नेमलेल्या आयोगाला महाविकास आघाडी सरकार कोणतेही सहकार्य करीत नसल्याची टिका त्यांनी केली.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारने जाणीवपूर्वक दोन वर्ष वाया घालवली असल्याचा स्पष्ट करून आरक्षणाचा खोटा कळवळा सरकारमधील मंत्री दाखवत राहीले. मोर्चे काढून राजीनामा देण्याच्या वल्गना झाल्या पण यांचे राजीनामे शरयू नदीत वाहून गेल्याचा टोला लगावून विखे पाटील म्हणाले की,भाजप सरकार सतेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे धाडस देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले ओबीसीचे आरक्षण टिकवण्यात सुध्दा भाजप सरकारने गतीने पावले टाकली. पण महाविकास आघाडी सरकार फक्त दोन वर्ष वर्क फ्राॅम होम करीत होते. आता मंत्रीच जेल मध्ये गेल्याने वर्क फ्राॅम जेल सुरू असल्याने सरकारकडे कोणत्याच समाज घटकांना न्याय देण्यासाठी वेळ नाही. जनाधार नसलेले सरकार फक्त वेगवेगळ्या विषयातून जनतेचे लक्ष विचलित करीत असल्याची घणाघाती टिका आमदार विखे पाटील यांनी केली. ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, यांची याप्रसंगी भाषण झाली.
