केवळ… निवडणूका आल्‍या म्‍हणून, काम करण्‍याची पध्‍दत विखे पाटील परिवाराची नाही — शालिनीताई विखे पाटील 

प्रतिनिधी —

केवळ निवडणूका आल्‍या म्‍हणून, काम करण्‍याची पध्‍दत विखे पाटील परिवाराची नाही. जनतेच्‍या सुखदुखामध्‍ये सहभागी होवून शासकीय योजनांचा लाभ जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न हा सातत्‍याने सुरु असतो. कोव्‍हीड संकटातही कुटूंबाप्रमाणेच जनसेवा फौंडेशन समाजाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले असल्‍याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विभाग आणि जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने शेडगाव येथे आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. याप्रसंगी जिल्‍हा परिषद सदस्‍या ॲड. रोहीणी निघुते, दिनशे बर्डे, पंचायत समिती सदस्‍य गुलाबराव सांगळे, आदिवासी विभागाचे समन्‍वयक सुरेश राठोड, आश्‍वीनी बॅंकेचे संचालक संपतराव सांगळे, सोसायटीचे चेअरमन रमेश नागरे, सरपंच राजेंद्र बढे, दिलीपराव नागरे, सखाहरी नागरे यांच्‍यासह ग्रामस्‍थ आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्‍हणाल्‍या की, समाजातील सर्वच घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्‍हणून शिर्डी मतदार संघात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून काम सुरु असते. आदिवासी बांधवांकरीता स्‍वतंत्र विभाग कार्यरत आहे. जिल्‍हा परिषदेमध्‍ये अध्‍यक्ष म्‍हणून काम करताना शासनाच्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन, या योजनांची लोकाभिमुखता वाढविल्‍यामुळेच योजनांचे महत्‍व लोकांना कळले. शासकीय योजनांचा लाभ प्रत्‍येक माणसाला मिळाला पाहीजे ही भूमिका ठेवूनच शिर्डी विधानसभा मतदार संघात काम होत असल्‍याने योजनांच्‍या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदार संघ पहिल्‍या क्रमांकावर असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

यापूर्वीही जनसेवा फौंडेशनने जिल्‍ह्यातील २०८ आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या कुटूंबियांना दत्‍तक घेवून त्‍यांना सर्वोतोपरी मदत केली. या कुटूं‍बातील मुलींच्‍या लग्‍नालाही अर्थसहाय्य देण्‍यात येत असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, कोव्‍हीड संकटात जनसेवा फौंडेशनने सर्व समाजघटकांच्‍या पाठीशी उभे राहण्‍याची भूमिका घेतली. केवळ निवडणूका आल्‍या म्‍हणून काम करण्‍याची पध्‍दत विखे पाटील परिवाराची नाही. समाजाच्‍या सुखदुखात सहभागी होण्‍याची बांधिलकी जोपासली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोव्‍हीड संकटात संपूर्ण देशवासीयांना मोफत लस उपलब्‍ध करुन दिली तसेच मोफत धान्‍यही दिले. मध्‍यंतरी बंद पडलेली आदिवासी खावटी योजना कोव्‍हीड संकटानंतर सुरु करुन, पुन्‍हा आदिवासी समाजाला दिलासा दिला. येणा-या काळात आदिवासींच्‍या घरकुल योजनांना आपला प्राधान्‍यक्रम असेल अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!