संगमनेर तालुक्यातील चांगले काम काही लोकांना बघवत नाही — महसूलमंत्री थोरात
विखे पिता – पुत्रांचे नाव न घेता जोरदार टीका

निमोण पाणीपुरवठा योजनेचे महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते जलपूजन
प्रतिनिधी–
संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सातत्याने सुरू असून विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळत आहे. या सर्व प्रगतीच्या वाटचालीमध्ये अनेकांचे योगदान असते. त्या सर्वांच्या प्रती आदर राखणे, निष्ठा राखण्याची आपली संस्कृती आहे. ही परंपरा तालुक्यात जपली जात आहे. मात्र काहींना कितीही समजावले तरी त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडत नाही. संगमनेर तालुक्याचा विकास हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. आपला तालुका, आपल्या सहकारी संस्था अत्यंत चांगल्या आहेत आणि हे काही लोकांना पहावत नाही. म्हणून ते स्थानिक काहींना हाताशी धरून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता- पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे.

सततच्या पाठपुराव्यातून पूर्ण झालेल्या निमोन, कऱ्हे, सोनेवाडी, पळसखेडे, पिंपळे या पाच गावांकरिता असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले असून या योजनेमुळे या पाचही गावांना पिण्याचे पाणी शाश्वत मिळणार असल्याने या गावातील नागरिकांसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे.

निमोण येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गावात आलेल्या पाण्याचे जलपूजन या योजनेचे शिल्पकार महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे, पंचायत समिती सदस्या मिरा चकोर, आर्किटेक्चर बी.आर.चकोर, डॉ. जयश्री थोरात, सह्याद्री संस्थेचे संचालक ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घूगे, जि. प .सदस्य प्रताप शेळके, बंडुनाना भाबड, अनिल घूगे, दिप्ती सांगळे, दगडु घूगे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे साहेबराव मंडलिक, गंगाधर जायभाये आदी उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले की, आजचा दिवस हा या पाच गावांसाठी ऐतिहासिक आहे. अनेक अडचणीवर मात करून अवघड वळणांमधून आज ही पाणी योजना पूर्णत्वास आली आहे. या योजनेद्वारे निमोन,पळसखेडे, पिंपळे, सोनेवाडी,क-हे या पाच गावांना शाश्वत पिण्याचे पाणी मिळणार आहे. मीरा चकोर आणि बी.आर. चकोर यांनी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यातून ही स्वप्नवत योजना साकार झाली आहे. यामुळे प्रत्येक गावातील टाकीत पाणी पोहोचणार आहे. पुढील टप्प्यामध्ये वाडी-वस्ती पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काम केले जाईल.

भाजपाने कायम कूटनीतिचे राजकारण केले आहे. मागील पाच वर्षात त्यांनी शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक दिली. आता या सरकारसाठी दररोज नवीन नवीन तारखा देत आहेत. भविष्य सांगत आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चिरडणाऱ्या भाजपाला कधीही, गोरगरीब व शेतकऱ्यांबद्दल सहानुभुति नाही अशी टीकाही त्यांनी केली.

बी. आर .चकोर म्हणाले की, या योजनेमुळे पाच गावांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कामी नामदार बाळासाहेब थोरात यांनी वरिष्ठ पातळीवर सर्व अडचणी सोडविण्यात तसेच शासकीय पातळीवर इंद्रजीत थोरात यांचीही मोलाची मदत झाली. त्यामुळेच ही योजना पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आज निमोन व परिसरातील गावांसाठी सोन्याचा दिवस आहे. ही मोठी योजना पूर्ण करण्याचे काम थोरात यांनी केले आहे. या योजनेमुळे आपल्या गावातील सर्वांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. थोरात साहेबांना राज्यात मोठी जबाबदारी आहे. तरी ते आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहेत.

यावेळी चंद्रकांत घुगे, जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रम प्रसंगी नूतन सोसायटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाच गावातील व पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
