केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय लाटणे हाच संगमनेर तालुक्यातील नेत्यांचा उद्योग ! — खासदार डॉ. सुजय विखे पाटील

महसूल मंत्र्यांचे नाव न घेता थेट समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान
कार्यकर्त्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही —
खासदार विखे यांचा इशारा
प्रतिनिधी —
केंद्र सरकारच्याच योजनांचे श्रेय लाटण्याचे काम सध्या तालुक्यात सुरु आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या आणि पाणी योजनांच्या कामासाठीही केंद्रानेच निधी दिला, मात्र प्रधानमंत्र्यांचे नाव घ्यायची सुध्दा यांची दानत नाही, केंद्राच्या निधीबाबत समोरासमोर येवून कुठेही चर्चा करण्याची आपली तयार आहे असे थेट आव्हान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राष्ट्रीय वयोश्री योजनेतून तालुक्यातील ५ हजार जेष्ठ नागरीकांना ६ कोटी रुपयांचे साधन साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच उपलब्ध झाले असल्याची माहीतीही त्यांनी याप्रसंगी दिली.

तालुक्यातील निमोण येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ६१४ जेष्ठ नागरीकांना मंजुर झालेले साधन साहित्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार डॉ.विखे पाटील यांनी वयोश्री योजनेचे संपूर्ण जिल्ह्यात झालेले काम विषद करुन, या योजनेवर शंका घेणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

याप्रसंगी संगमनेर भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपूले, किसान आघाडीचे सतिष कानवडे, सुदामराव सानप, भाजयुमोचे श्रीराज डेरे, शैलेश फटांगरे, संदिप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, जेष्ठ नागरीकांच्या खऱ्या व्यथा मोदींसारख्या नेतृत्वाने जाणल्या, यातूनच वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली. नगर जिल्ह्यामध्ये या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असून, संगमनेर तालुक्यात ५ हजार जेष्ठ नागरीकांना ६ कोटी रुपयांचे साधन साहित्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यात केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग आणि पाणी योजनांचे काम सुरु आहे. परंतू या सर्व कामांचे श्रेय तालुक्याचे नेतेच घेत आहेत. केंद्र सरकारने या तालुक्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या निधीबाबत समोरासमोर येवून कधीही चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे थेट आव्हान देवून खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील आधिकारीही कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. परंतू या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून, यापुढे तालुक्यात कोणताही अन्याय अत्याचार सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र सरकारच्या माध्यमातून देश हिताचे आणि समाज हिताचे काम सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. २०२४ साली त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना दिले.

सरपंच संदिप देशमुख यांनी निमोण आणि पंचक्रोषितील पाणी प्रश्नावर आजपर्यंत झालेल्या फसवणूकीबद्दल आपल्या भाषणात तिव्र नाराजी व्यक्त करुन, कोव्हीड संकटाच्या काळात विखे पाटील परिवाराने निमोण आणि पंचक्रोशितील गावांना केलेल्या मदतीचा आवर्जुन उल्लेख केला. स्थानिक नागरीकांनी सुरु केलेल्या कोव्हीड सेंटरला मान्यता देवू नये म्हणून तालुक्याच्या नेत्यानी प्रयत्न केले होते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते तळेगाव, निमोण येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तळेगाव पासुन ते निमोण पर्यंत खासदार डॉ. विखे पाटील यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांन उस्त्फूर्तपणे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेले काम हे सबका साथ सबका विश्वास या मंत्रानेच सुरु आहे. या माध्यमातून समाजातील शेवटचा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संपूर्ण देशभर सुरु आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना हा त्याचाच एक भाग असून या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४० हजार जेष्ठ नागरीकांना साधन साहित्य उपलब्घ करुन देता असल्याचे समाधान खुप मोठे आहे अशी प्रतिक्रीया आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केली.
