कुणी काहीही करा ! मला फक्त आमदार करा !!

 

आमदारकी मिळवण्याकरता कोणत्याही थराला जाणाऱ्या व्यक्ती या राज्यातच काय देशात आहेत. आपल्याला फक्त आमदार व्हायचे आहे. बाकी समाजाचे आपले काही घेणेदेणे नाही. संस्कृतीशीही आपले काही घेणेदेणे नाही. अशा राजकीय साठमारीत अडकलेले हे नेते देशात आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी पसरलेले असल्यामुळे देशाची संस्कृती, इतिहास याचे नुकसान तर होणारच.

एका गावात एक आमदार आहे. या आमदाराला फक्त आमदारकी कशी टिकवता येईल याचीच काळजी नेहमी पडलेली असते. मग त्या गावांमध्ये कोणी काहीही करा, कोणतेही धंदे करा, कोणत्याही पक्षाचे काम करा, भ्रष्टाचार करा, अवैध धंदे करा, बेकायदेशीर बांधकामे करा, काहीही करा फक्त मला मतदान करा. अशी भूमिका असलेला हा आमदार अनेक वर्षापासून तालुक्याच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे.

या आमदारांमुळे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे आपल्या गावातल्या लोकांवर समाजावर काय परिणाम होतो याचे या माणसाला काही घेणेदेणे राहिलेली नाही. कोणत्याही विचारांचा पगडा या माणसावर नाही. ना साम्यवादी, ना समाजवादी विचारसरणी, ना हिंदुत्ववादी विचारसरणी, ना आंबेडकरी, ना स्वतःच्या पक्षाची विचारसरणी कोणत्याही विचारसरणीचा पगडा या माणसाला नाही. मुळात अशा विचारसरणीचे या व्यक्तीला काहीच घेणे देणे नाही. अशा कोणत्याही विचारसरणीने हा माणूस काम करत नाही. फक्त मला आमदार करा आणि माझी आमदार की अबाधित  ठेवा. असा प्रकार या माणसाच्या मतदार संघात चालू आहे.

मतदार संघात विकासासाठी पैसा आणायचा त्यातून ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर पोसायचे किंवा ठेकेदारांना राजकारणात आणायचे आणि आपली दुकानदारी पक्की करून घ्यायची. आपली टक्केवारी फिक्स करून घ्यायची. असे प्रकार या आमदाराचे चालू असतात. बदल्या – बढत्या हे तर यांचे उत्पन्नाचे साधन. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्यस्तरीय विविध खात्यातला मलिदा मिळवणे किंवा गोळा करणे हेच ध्येय आणि हीच विचारसरणी.

मतदार संघातील आणि गावातले विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, नेते, पुढारी, गाव पुढारी, पारा वरचे पुढारी हे फक्त पाच वर्ष या आमदाराच्या विरुद्ध  आरडाओरडा करत असतात. पेपर बाजी करत असतात. पत्रकबाजी करत असतात. लुटूपुटूची राजकीय लढाई करत असतात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे सर्व तसेच या संघटनांचे नेते व काही महत्त्वाचे पदाधिकारी या आमदारांसाठी छुप्या पद्धतीने काम करताना दिसतात.

त्यामुळे या मतदारसंघात विरोधकांची सुद्धा  चलती आहे. त्यांच्या शिक्षण संस्था, दूध धंदे, सहकारी संस्था, व्यापार, वैद्यकीय धंदे, लँड डेव्हलपर्स, बिल्डर्स इतर धंदे या आमदाराच्या छत्रछायेखाली सुरळीत चालू आहेत. त्यामुळे त्यांनाही काही घेणे देण नाही. त्यांचीही  कोणत्याही विचारांशी बांधिलकी नाही. सबकुछ आलबेल है !

या मतदारसंघातले व्यापारी, उद्योजक तथाकथित उद्योगपती कोणतेही आव आणत असले तरी विधानसभेला मात्र हे सगळे या आमदाराच्या पाठीशी उभे राहतात.असले भंपक उद्योजक स्वतःच्या घरी पाच वर्ष कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतात. कधी कधी यांच्या खांद्यावर केंद्राचे व राज्याचे सगळे झेंडे विसावलेले असतात. 

निवडणुकीला हे तथाकथित उद्योजक मंडळी सगळे झेंडे खाली ठेवून या आमदाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. या उद्योजक मंडळींच नेमकं काय ‘नाजूक सीक्रेट’ या आमदाराच्या हाती लागले आहे. हे फक्त त्यांनाच माहीत. त्यामुळे आमदारांचे विरोधक सुद्धा आमदारांचेच असतात, मतदारही आमदारांचे आहेत.

संस्कृतीचा, इतिहासाचा आणि सामाजिक शांतीचा मात्र घोटाळा झाला आहे. नैतिकता, तत्वे, पक्षनिष्ठा यांना फाट्यावर मारल्या जाते. पैसा प्रतिष्ठा प्राप्त करून बसला  आहे. सत्तास्थाने ताब्यात आहेत. त्यामुळे कुठलीही पिढी घडविण्याचे काम न करता फक्त आपली सत्ता अबाधित ठेवणे. एवढे एकच काम या आमदाराने केले आहे. आणि इथून पुढील काळातही आमदाराच्या अनेक पिढ्या तेच करणार आहेत.

 

आज १ एप्रिल २०२२ आहे…

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!