संगमनेरात उंदरांची संख्या वाढत आहे !

घुबडांना आणि सापांना सांभाळा !!
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यात उंदरांची संख्या वाढू लागल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सावध व्हायला हवे. यामुळे भविष्यात आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. शेतीचे नुकसान वाढू शकते. उंदरांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत. आरोग्य यंत्रणेने देखील सजग होऊन उपाययोजना करायला हव्यात.

संगमनेर शहर आणि तालुक्यात उंदरांची संख्या वाढू लागली असल्याचे मत येथील सर्पमित्र सचिन गिरी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. सापांना पकडण्यासाठी संगमनेर शहरासह तालुक्यात आणि ग्रामीण भागात गावो गावी ते सतत फिरत असतात. शेतीतील आणि एकंदरीत आजुबाजूची परिस्थिती पाहता त्यांनी वरील मत व्यक्त केले असल्याचे सांगितले आहे.

संगमनेर तालुक्यात सापांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे देखील उंदरांचे प्रमाण वाढत आहे. उंदीर आपले मलमूत्र विसर्जन हे नेहमी स्वच्छ ठिकाणी करतो. उंदीर अनेक विषारी कीटकांचा वाहक असल्याने मानवाला, मानवाच्या आरोग्याला देखील त्याचा अपाय होऊ शकतो. शेतीचे तर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे सचिन गिरी यांनी सांगितले आहे.

मानवाच्या जिवावर उठलेली प्लेगची साथ ही उंदरांनीच पसरवली होती.
यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी प्राणी तज्ज्ञ आणि यावर संशोधन करीत असलेले प्रा. लक्ष्मण घायवट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उंदरांची संख्या ही वाढत असल्याच्या बातमीत तथ्य आहे. शेताच्या बांधांवर बिळांची संख्या वाढणे, शेतीमध्ये करण्यात आलेल्या धान्यांना कुरतडणे, सध्या गव्हाचा सीझन आहे. गव्हाच्या ओंब्या कुरतडणे, त्या विशिष्ट ठिकाणी नेऊन साठवणे असे प्रकार दिसू लागल्यास प्रमाण वाढले असल्याचे समजून येते.

उंदरांच्या अंगावर वेग वेगळ्या प्रकारचे किटाणू असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस पसरू शकतात. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी धान्य साठा करतो, दुकान, घरातले किचन या भागात उंदरांचा राबता जास्त असतो. रात्रीच्या वेळी घरातल्या भांड्यांवर उंदीर फिरत असतात आणि त्यांची संख्या खूप मोठी असल्याने सर्वत्र विषाणू पसरले जातात. त्यामुळे रोगजंतू पसरण्याचे माध्यम खूप प्रभावी होते आणि मग त्याचा परिणाम पर्यावरण, अन्नधान्य उत्पादन आणि मानवाचे आरोग्य यासाठी धोकादायकच आहे.

उंदरांना मारण्यासाठी विषारी औषधे टाकली जातात. मात्र त्यामुळे अनेक वेळा इतर छोटे-मोठे प्राणी मरून पडलेले आढळून येतात. खारुताईला याचा जास्त परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे अशी औषधे टाकू नयेत असे सांगितले जाते. विशेष म्हणजे ही औषधे पाण्यातून मातीत मिसळतात आणि मातीतील चांगले जीवजंतू ,बॅक्टरिया, कृमी नष्ट होतात. त्याचा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे शेतीमध्ये जास्त प्रमाणात उंदीर झाले तर ते कमी करण्यासाठी प्रभावी उपाय देखील आहेत.

घुबडांना आणि सापांना सांभाळा !
इस्रायल देशाने नुकताच एक प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे. शेतातल्या बांधांवर बांबूंचे मचान तयार करायचे किंवा तारांना बांबू बांधायचे जेणेकरून या बांबूवर घुबड येऊन बसतील. रात्रीच्या वेळी घुबडांचा संचार जास्त असतो. घुबडं दिवसा फिरत नाहीत आणि घुबडांचे अन्न हे उंदीर मोठ्या प्रमाणावर आहे. शेतातील इतर अन्नधान्य, फळांना घुबडापासून नुकसान होत नाही. घुबड शक्यतो जमिनीवर बसत नाहीत. झाडांवर किंवा अशा बांबूवर ते बसू शकतात. त्यामुळे तशी उपाययोजना करून प्रयोग केले असता. घुबडाने रात्रीच्या वेळी बिळातून बाहेर पडणारे उंदीर खाऊन टाकल्याचे आढळून आल्याने. उंदरांची संख्या कमी होत गेली. अशा प्रकारचा प्रयोग आपल्याकडेदेखील करण्यास हरकत नाही. जेणेकरून घुबडांना शेतात, शेतातल्या मध्यभागात बांबूवर येऊन बसता येईल किंवा असे मचान तयार करावेत. घुबडं उंदरांचा नायनाट करते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तसेच सापांना सांभाळणे देखील महत्त्वाचे झाले आहे. विशेषत: धामीण जातीचा साप हा सर्वात महत्त्वाचा असून त्यांची संख्या कमी होत असल्याने उंदरांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे धामीण सर्प हा मोठ्या प्रमाणावर जपला पाहिजे. धामीण उंदरांचा नायनाट करते. त्यामुळे भविष्यात उंदरांपासून मोठ्याप्रमाणावर संकट उद्भवू नये म्हणून घुबड आणि धामीन यांना सांभाळा असे आवाहन देखील प्रा. लक्ष्मण घायवट यांनी केले आहे.

