देवस्थान जागेच्या सातबारा उताऱ्यावरील नावे गायब !
तहसील कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

संगमनेरी “मुळशी पॅटर्न” असल्याची चर्चा !
प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील म्हसोबा देवस्थान जागेच्या सातबारा उताऱ्यावर असलेली काही पंचांची नावे परस्पर वगळण्यात आल्याचा आरोप संबंधिताच्या नातेवाईकांनी केला आहे.
ही नावे वगळल्यानंतर माहिती अधिकारात यासंदर्भात माहिती विचारली असता उत्तर देण्यास देखील टाळाटाळ केली जात असून आता तहसील कार्यालयाच्या माहिती अधिकार विभागाच्या विरोधात अपील करावे लागले आहे.

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील रहिवासी दीपक वाघ यांनी हा आरोप केला असून त्यासंदर्भात त्यांनी संगमनेर तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार देखील केलेला आहे.
विशेष म्हणजे सातबारावर उताऱ्यावर असलेले ही नावे सन २०१२ पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर मात्र ती गायब झाली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

म्हसोबा देवस्थान जागेच्या सातबारा उताऱ्यावर पंच गंगा भिवा, नामदेव शिवा साळवे, कोंड्याबाई ठकाजी वाघ, कुशाबाई चंदा वाघ, यशोदाबाई देवका मनोहर अशी नावे होती. त्यातील नामदेव भिवा साळवे, कोंड्याबाई ठकाजी वाघ, यशोदाबाई देवका मनोहर हे पंच किंवा त्यांचे वंशज यांची नावे वगळली गेली असल्याचे आढळून आले आहे.

सदरच्या उताऱ्यावरील नावे कमी करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी काही अर्ज वगैरे केला असेल तर त्याची देखील माहिती मिळावी अशी मागणी तक्रारदाराच्या वतीने करण्यात आली आहे. फेरफार नोंदी कशाच्या आधारावर करण्यात आलेल्या आहेत ? त्या साठी कोणी अर्ज दिला होता का ? कोणी प्रतिज्ञापत्र दिले होते का ? असे सवाल वाघ यांनी उपस्थीत केले आहेत.

मात्र यासंबंधी अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही. माहिती देण्या साठी जाणीवूर्वक टाळाटाळ केली जात आहे. डिसेंबर २०२१ मध्ये माहिती अर्ज दिलेला असून उद्यापर्यंत वाघ यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
संगमनेर तालुका महसूल कार्यालयातील कागदत्रांवरिल किरकोळ बदलांची माहिती देण्यासाठी सुमारे ६० ते ७० दिवसांचा कालावधी गेला असला तरी सदर माहिती तहसील कार्यालयाकडून संबंधिताला मिळाली नसल्याचे अर्जदाराचे म्हणने आहे. एवढी लपवा छपवी कशासाठी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

यासंदर्भात जुने-नवे सातबाराचे उतारे देखील तक्रारदाराने उपस्थित केलेले आहेत. एवढेच नव्हे तर भूमिअभिलेख खात्यातील एकत्रीकरण (गट स्कीम उतारा) उताऱ्यावर वरील वगळलेली नावे असल्याचे दिसून येत आहे.
मात्र तहसील कार्यालयाच्या नव्याने निघणाऱ्या सातबारा उताऱ्यावरून संबंधितांची नावे गायब झाल्याचे दिसून येत आहे. या जागेच्या काही जुन्या सातबारा उताऱ्यावर नावे आहेत.नव्या सातबारा उताऱ्यावरून मात्र नावे गायब आहेत. अशी परस्पर नावे गायब होण्याचा हा “संगमनेरी मुळशी पॅटर्न” प्रकार असल्याची चर्चा आहे.
