पोलीस वसाहतीमधून ट्रॅक्टर चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात !
पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाची कामगिरी

प्रतिनिधी —
शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमधील वाळूचोरीत जमा करण्यात आलेला ट्रॅक्टर चोरून पोबारा करणाऱ्या अट्टल चोरट्यास संगमनेर पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने पकडले असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

अजित उर्फ करमाळ्यात अरुण ठोसर (वय २२ वर्षे, रा. पंपिंग स्टेशन, संगमनेर) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली सह एक पल्सर मोटरसायकल असा एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

गौण खनिज चोरीतील ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एम एच १७ बी एक्स १३८५ हा संगमनेर शहर पोलिस वसाहतीत लावलेला होता. वरील ट्रॅक्टर गौणखनिजांनी भरलेली ट्रॉली कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू होता. ही घटना डिसेंबर २०२१ मध्ये घडली होती.

दरम्यान तपास चालू असताना पोलिस उप अधीक्षक राहुल मदने यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल चोरणारा आरोपी कोपरगाव येथे आहे. असे समजल्यानंतर मदने यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, पोलीस नाईक फुरकान शेख या पथकाने सदर आरोपीला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव येथून ताब्यात घेतले.

तसेच त्याने सदर गुन्हा कबूल केला असून त्याच्या साथीदाराचे देखील नाव सांगितले आहे. सदर आरोपी विरोधात संगमनेर शहर व तालुका पोलिस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच नाशिक येथील चांदवड पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे.
या अट्टल गुन्हेगारास पकडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
