महिलेचा विनयभंग करून दरोडा टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध दाखल

दगडफेक करून दहशत
संगमनेर मधील घटना
प्रतिनिधी —
चोरी करीत असल्याचे सांगू नये म्हणून संगमनेर शहरातील लाल तारा हाउसिंग सोसायटी, अकोले नाका मधील एका महिलेचा विनयभंग करून दरोडा टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरफराज राजू शेख, अमर मच्छिंद्र गोपाळे, अजय विजय वाल्हेकर, राहुल भरत सोनवणे, संतोष दशरथ जेडगुले, अखिल भाऊसाहेब लोखंडे, आदित्य संपत सूर्यवंशी व इतर दोन-तीन (रा. सर्वजण संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी लाल तारा सोसायटी, अकोले नाका येथील काही लोकांनी वरील आरोपींना चोरी करताना पाहिले होते. संबंधित फिर्यादी महिला व सोसायटीमधील लोकांनी वरील आरोपी यांची तक्रार करू नये म्हणून या आरोपींनी संबंधित महिला घरी तिच्या घरासमोर धुणे धुवत असताना तेथे जाऊन हातात दगड, लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि गलोल घेऊन तिच्या पतीची दारात उभी असलेली मोटारसायकल क्रमांक एम एच १७ बी टी ९२७ हिच्यावर दगड टाकून फोडली. व त्या गाडीची तोडफोड केली.

तसेच संबंधित दरोडेखोर फिर्यादी व सोसायटीतील लोकांना शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. संबंधित फिर्यादी महिलेने सदर आरोपीना जाब विचारता या मधील आरोपी अजय वाल्हेकर याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. याठिकाणी सोसायटी मधील लोक जमा झाल्यावर त्यातील एका दुसऱ्या महिलेने सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील हिसकावून घेण्यात आले. आणि फिर्यादी महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्याचप्रमाणे जमा झालेल्या साक्षीदारांवर गलोलने दगड मारून, दगडफेक करून, मोठी दहशत करून सोसायटीवर दरोडा टाकून पोलीस येत असल्याचे पाहून पळून गेले. याप्रकरणी वरील सात जण आणि त्यांच्या दोन तीन अज्ञात साथीदारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
