संगमनेरात भर दिवसा सव्वा चार लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवली !
प्रतिनिधी —

घरात कोणी नाही याचा फायदा घेत भर दिवसा सुमारे सव्वाचार लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन जणांवर संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन काशिनाथ रोकडे (रा. बालाजीनगर, संगमनेर) अशोक बडे (रा. तळेगाव, संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिता दिनकर काळे (रा. स्वदेश हॉटेल च्या पाठीमागे, पुणे नाशिक हायवे, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अनिता काळे या संगमनेर येथील चंनापुरी आरोग्य विभागात कमास आहेत.

शनिवारी त्या कामावर गेल्या असता दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून वरील दोन आरोपींनी त्यांच्या घराच्या आवारात ठेवलेले बांधकाम साहित्य (बांधकाम सेंट्रींग साहित्य) तसेच घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामधील डब्यांमध्ये असलेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम आणि मंगळसूत्र, कानातील झुमके, चैन, लटकन साखळी, अंगठ्या आणि चांदी असे २ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. रोख रक्कम आणि दागिने मिळून एकूण ४ लाख २२ हजार ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे.

यासंदर्भात काळे यांनी रविवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी रोकडे याने काळे यांच्या घराच्या बांधकामाचे काम घेतले होते. ते काम व्यवस्थित न केल्याने त्याच्याकडून काळे यांनी काढून घेतले होते. ह्या कामापोटी काळे यांनी रोकडे यांना जे कामापोटी पैसे दिले होते त्यात जादा पैसे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या कामाचे पैसे मागितले. त्या ठिकाणी सेंट्रींग चे सामान घराच्या आवारात पडून होते. हे सामान घेण्यासाठी तो आला असता काळे यांनी त्याला घराच्या कामाचे दिलेले जादा पैसे परत मागितले. त्यावेळी त्याने उद्या येऊन हे पैसे देऊन मी माझे सामान घेऊन जातो असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी काळे या नोकरीच्या ठिकाणी निघून गेल्या. तसेच त्यांचा मुलगा आणि सून यांना बाहेरगावी जायचे असल्याने ते सुद्धा घरी नव्हते. त्यानंतर काळे या सायंकाळी घरी आल्या असता त्यांना गेटचे कुलूप तोडले दिसले. आवारातील बांधकाम सेंट्रींग चे सामान गायब दिसले. शेजार्यांकडे चौकशी केली असता त्यांनी वरील दोन लोक दुपारीच सामान घेऊन गेले असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे घराच्या दरवाजाचे कुलूप देखील तोडलेले त्यांना आढळून आले. घरात जाऊन त्यांनी पाहिले असता घरातील सामानाच्या डब्यांमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि बेडरुमच्या कपाटा मधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रोकडे आणि बडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
