- चिमणी फक्त गाण्यागोष्टी साठी नाही तर जपण्यासाठी आहे…
आज जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानिमित्त ‘संगमनेर टाइम्स’च्या वाचकांसाठी कोपरगाव येथील एसएसजीएम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका कांचन रूपटके यांनी लिहिलेला खास लेख वाचकांसाठी देत आहोत.
प्रा.कांचन रुपटके
पृथ्वी ही केवळ मानवासाठी नाही तर सर्व प्राण्यांचा तिच्यावर सारखा अधिकार आहे, मग तो मोठा हत्ती असो की छोटी मुंगी असो. समुद्रातील महाकाय देवमासा असो किंवा मातीतील छोटी गांडूळे असोत.

माणूस सोडता या उपग्रहावरील प्रेत्येक प्राणी आपल्या परीने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण अन्नसाखळीचा महत्वाचा घटक आहे, त्यातील कोणत्याही घटकाला होणारी बाधा ही पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरते, आपण जागतिक पर्यावरण दिन खूप उत्साहात साजरा करतो पण तो फक्त एक दिवसासाठी दुसऱ्या दिवशी कृती मात्र शून्य असते.

आज जागतिक चिमणी दिवस असाच साजरा होतोय तो ही उद्या विसरून जाण्यासाठीच, प्राणिशस्त्र विषयाची प्राध्यापिका असल्याने चिमणीविषयी थोडीशी आत्मियता आहेच आणि जन्मापासूनच जोडलिया गेली आहे.
चिमणी हा आशियातील छोटा पक्षी, लहान मुलांपासून सर्व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेणार, भुर्रकन उडणारा, ताशी २४ मैलाचे अंतर कापणार,आणि सुमारे ४ ते ५ वर्ष जगणारा पक्षी, तो माणसांच्या जवळपास राहणारा आणि त्यांची सवय झालेला पक्षी, भारतामध्ये सर्वात जास्त संख्येने सापडणारा म्हणून ओळखला जाणारा पक्षी.

हा पक्षी माणसाच्या जवळ राहतो आणि अवतीभोवती सापडणारे कीटक, धान्य, शिजवलेले अन्न, असे सर्व प्रकारचेअन्न ग्रहण करतो. हा पक्षी स्वतःचे घरटे स्वतः बनवतो, पावसाळ्याच्या सुरवातीला हा हिरव्या बारीक गवतापासून घरटे बनवायला सुरवात करतो. जंगलात त्याची घरे झाडाच्या फांद्या व सावलीत असतात.
पण मानव वस्तीतील त्याचे घरे अनेक ठिकाणी पहायला मिळतात उदा. घराच्या छताला, वळचणीच्या ठिकाणी, जुने घरे, घरातील फोटोंच्या मागे, आता काही चिमण्या माणसाने कृत्रिमरीत्या बनवलेल्या घरांचा सहारा घेताना दिसतात. एक चिमणी साधारणपणे २ ते ३ अंडी घालते, हे वर्षभर चालू असते. ती आपल्या पिलांना चोचीत चारा आणून भरवते, साधारणतः १३ ते १५ दिवसांत पिल्लं घरट्यातून बाहेर पडतात आणि १५ ते २० दिवसात उडायला लागतात.

त्यामुळे घरात जर चिमणीची घरटी असतील तर आपण तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, चिण्याची काळजी या करता घेतली पाहिजे कारण चिमणीच्या अंड्याना अनेक शत्रू पासून जपावे लागते, मांजर, साप, कुत्रे, लांडगे, गरुड हे चिमण्यांची अंडी तर खातातच पण चिमण्यांची शिकारही करतात.
वाढते शहरीकरण, आधुनिकीकरण, वाढते प्रदूषण, बेसुमार होणारी वृक्षतोड, या सर्व मानवनिर्मित समस्यांमुळे चिमण्यांची संख्या कमी होताना दिसते, चिमणी तसा खूप बुद्धिमान पक्षी आहे. ए ब्रेमने त्यांच्या अभ्यासावरून निष्कर्ष काढला आहे की, हा पक्षी साधा वाटत असला तरी तरी तो खूप प्रभावशाली पक्षी आहे, तो खूप समजूतदार आहे, तो हळू हळू माणसांना आणि प्राण्यांना ओळखु लागतो.

तो आपल्या सहकार्याचे रक्षण करतो. तो धोक्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करतो आणि जर त्याला धोका वाटला तर तो सर्वाना सुचितही करतो. तो जशी आपल्या अंगणाची शोभा वाढवतो तसेच कीटक, अळ्या खाऊन तो पिकांच्या रक्षणासाठी तत्पर असतो, पण त्याच महत्व कुणालाच वाटत नाही.
चीन मध्ये १९५० मध्ये पिकांच्या होणाऱ्या नुकसानी मूळे चिमण्या मारण्याचे कुकर्म केले गेले, हजारो चिमण्या मारल्या गेल्या पण त्याचा परिणाम उलट झाला तिथे किड्यांची संख्या इतकी वाढली की त्यांनी पिकांचे चिमण्यां पेक्षाही जास्त नुकसान केले.

जर अशीच वेळवेगल्या पक्षांची संख्या कमी होत राहिली तर हीच वेळ भारतावर येण्यासाठी जास्त काळ लागणार नाही. याची जाण आणि भान आपण ठेवले पाहिजे. हे ही आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेतले पाहिजे.
अनेक वेळा भक्ष्याच्या हल्ल्यामुळे, माणसांनी केलेल्या शिकारी मुळे, त्यांचा निवारा धोक्यात आल्याने, संकरित धान्याचं बी त्यानं खाता येत नसल्याने, कीटकनाशकांचा वाढत्या उपयोगाने प्रदूषण तर वाढते आहे पण चिमण्यांचे नैसर्गिक अन्न नष्ट झाले आहे. पूर्वीसारखे पाणी व अन्न सहज न मिळाल्याने चिमण्या मृत्युमुखी पडतात दिसतात, उन्हाळ्यात हे प्रमाण खुप मोठे असते, पाळीव जनावरांना दिलेल्या आयुष्याचा दुष्परिनामाणे गिधाडे नष्ट होतायेत, चिमण्या सध्या काय भोगतायेत माहित नाही.
आपण सुखासाठी धडपडत असताना आपल्यामुळे त्यांना जगण्यासाठी धडपडवावे लागते आहे. याचे भान माणसाला कधी येईल माहीत नाही.

आज निदान माणसाने विचार तरी करावा. एक दिवस असा येईल अंगणातील चिमणी भुर्रकन उडून जाईल कधी न येण्यासाठी, मग आपण दुर्मिळ पक्षी म्हणून फोटो जतन करू आणि त्यात धन्यता मानू
गोष्टीतील चिमणी, गाण्यातील चिमणी जपण्याची आज शपथ घेऊ. त्यांच्यासाठी रोज पाणी आणि चारा ठेऊ. आपल्या घरची सफाई करताना कुणाचं घर मोडणार तर नाही ना याची काळजी घेऊ, आपल्या छोट्या मुलीला जसे चिमणी म्हणतो ना तसच तिलाही मुलगी मानू, तिची काळजी घेऊ, तिलाही जीव लावू…..

प्रा. कांचन रूपटके, कोपरगाव
