तरुणीचा विनयभंग करून तिच्या आई-वडिलांना मारहाण
घारगाव मध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी —
महाविद्यालयात शिकत असलेल्या मैत्रिणी शिर्डी येथे दोन महिन्यापूर्वी गेल्या होत्या. त्यासाठी वापरलेल्या खासगी वाहनाचे राहिलेले भाडे मागितले म्हणून राग आल्याने दुसऱ्या मैत्रिणीने इतरांचा वापर करीत सदर तरुण मुलीला घरी बोलावून धमकी दिली. त्यानंतर धमकी देणार्यांनी तिच्या आई वडिलांना मारहाण करीत या तरुणीचा विनयभंग केला. पिडीत तरुणीने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सोमवारी पोलिसांनी घारगाव मधील सहा जणांविरुद्ध विनयभंगासह इतर गुन्हे दाखल केले आहेत.

जब्बार चौघुले, युसुफ चौघुले, हिना चौघुले, बाळू गायकवाड, अमूप (पूर्ण नाव माहीत नाही) आणि एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील एक तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सदर तरुणी तिच्या मैत्रिणीबरोबर स्वतंत्र वाहन करून शिर्डी येथे गेले होते. त्या घटनेला दोन महिने झाले आहेत. त्यानंतर फिर्यादी मुलीने दुसऱ्या मैत्रिणीकडे फोन करून राहिलेल्या भाड्याचे पैसे मागणी केली. त्या मैत्रिणीने पैसे देण्यासाठी हीना चौघुले यांच्या घरी सदर फिर्यादी तरूणीस बोलावून घेतले. मात्र सदर ठिकाणी न जाता मुलीचे वडील आणि आई हिना चौघुले यांच्या घरी गेले.

मात्र तेथील लोकांनी फिर्यादी तरुणीच्या आई-वडिलांना दमदाटी केली. तरुणीचे आई-वडील घरी निघून आले. नंतर फिर्यादी तरुणीच्या आई-वडिलांना जब्बार चौघुले याचा फोन आला की तुमच्याशी बोलायचे आहे इकडे आमच्या दुकानासमोर या असे सांगितले.

आई वडील गेले असता जब्बार चौघुले, युसुफ चौघुले, हिना चौघुले, बाळू गायकवाड, अमुप व एका अनोळखी इसमाने त्या दोघांना दमबाजी, शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून सदर तरुणी त्या ठिकाणी गेली असता जब्बार चौघुले याने सदर शरीराला झटून, तिला नकोशा ठिकाणी स्पर्श करून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच युसुफ चौघुले याने हातात सुरी घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली व बाकीच्यांनी आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद दिली.
याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र लांघे हे करत आहेत.
