संगमनेरात अवैध धंद्यांवर छापे ; मटकाकिंग फरार !
नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई

छापे झाले पुढे काय ?
ज्यांच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरू होते त्यांच्यावर कारवाई होणार का ?
प्रतिनिधी —
चार पोलीस स्टेशन आणि एक पोलिस उपअधीक्षकांचे कार्यालय असणाऱ्या संगमनेरात नाशिक येथून येऊन विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून संगमनेरात मोठी कारवाई केली आहे.

संगमनेर शहरातल्या अवैध धंद्यांवर छापे टाकून विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने संगमनेर शहर पोलिसांचे पितळ उघडे पाडले आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात अवैध धंद्यात एक नंबर वर असलेल्या संगमनेर शहरात किती मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार अड्डे, गांजा तस्करी, वाळू तस्करी, अवैध कत्तलखाने चालू असतात याची नेहमीच चर्चा झालेली आहे.

अनेक वेळा बातम्या आल्या आहेत. वृत्तपत्रांनी रकानेच्या रकाने भरले आहेत. स्थानिक पोलिसांकडून मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येते. संगमनेर शहर आणि तालुक्यात चार पोलीस ठाणे आणि एक पोलीस उपअधीक्षकांचे कार्यालय आहे. तरीही या तालुक्यातील अवैध धंदे थांबलेले नाहीत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. नंतर संगमनेरात अवैध धंद्यांवर मोठे गुन्हे दाखल झाले आहेत.

अवैध धंद्यांवर छापे टाकल्यानंतर हे अवैध धंदे सुरू असल्याचे उघड झाले आहे. आता हे अवैध धंदे सुरू होते आणि ते सुरू ठेवणारे कोण ? याचा तपास करून संबंधितांवर कारवाई होईल का ? अशी चर्चा संगमनेर शहरात सुरू झाली.
आहे विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाने सट्टा मटका अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात सुरेश भाऊराव अभंग, गणेश निवृत्ती पाठक, राकेश अशोक चिलका, यासीन उस्मान शेख, संदीप दत्तू काकडे, संपत गणाजी वैराळ, जालिंदर देवराम सातपुते, अशोक तुकाराम पावडे, गणपत भिमाजी सातपुते, निवृत्ती महादू वरपे आणि शंकर दत्तात्रय इटप या आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.

हे सर्व आरोपी संगमनेरातील बटवाल मळा, देवाचा मळा, घुलेवाडी, साईनगर, राजापूर, सुकेवाडी, इंदिरानगर, अशा विविध भागात आणि उपनगरात मटका टपऱ्या चालवत असल्याचे आढळून आले.
या संपूर्ण मटका धंद्याचा मालक शंकर दत्तात्रय इटप हा फरार झाला असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी एकूण ५५ हजार ५० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, पेटीएम साऊंड बॉक्स, मटक्याचे साहित्य असा मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक पथक, नाशिक परिक्षेत्र यातील प्रमोद सोनू मंडलिक यांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. झालेल्या या मोठ्या कारवाईतून संगमनेरात मटका धंदा किती उघडपणे चालतो हे स्पष्ट झाले आहे.
