सोनसाखळी चोरांकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !
दोन सराईत चोरटे ताब्यात !

संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात ‘चेन स्नॅचिंग’ चे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. अनेक वेळा याबाबत गुन्हे दाखल झालेले आहेत. संगमनेर शहर, तालुका, आणि पोलीस उपअधीक्षक यांनी या घटना गांभीर्याने घेऊन सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी विविध सापळे रचले. त्यात ते यशस्वी देखील झाले.

असेच दोन सोनसाखळी चोर तपास चालू असताना पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोनू उर्फ भैरव विश्वनाथ पवार (वय २२ वर्ष. रा. नायगाव, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक) आणि अविनाश उर्फ आवड्या देविदास आंधळे (वय २७ वर्ष. रा. नायगाव तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विचारपूस केली असता सोनसाखळी चोरीत त्यांचा मोठा हात असल्याचे आढळून आले.

काही दिवसांपूर्वीच वडगाव पान, तालुका संगमनेर येथील एका महिलेने सोनसाखळी चोरीची फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास केल्यानंतर हे दोघेजण चोर असल्याचे आढळून आले आहे. याकामी ग्रामस्थांनी पोलिसांना मोठी मदत केली.
या दोघांनी चोरीच्या केल्याची कबुली दिली असून संगमनेर शहर, पिंपळगाव बसवंत, मानोरी गाव, विंचूर येथे सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून साडे सोळा तोळे वजनाचे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या आरोपींनी केलेले विविध गुन्हे उघडकीस आले असून पिंपळगाव बसवंत, लासलगाव आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यातले पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक शिवाजी डमाळे, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर हे संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस नाईक फुरकान शेख हे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील नेमणुकीस असलेले, तसेच अमृत आढाव हे संगमनेर शहर पोलीस स्टेशनला नेमणूक असलेले, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर हे घारगाव ला नेमणूक असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे हे अकोले पोलीस स्टेशन नेमणूक असलेले या सर्वांनी या कारवाईत सहभाग घेतला होता आणि चोर पकडण्यास विशेष परिश्रम घेतले.
पोलिसांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता पुढील तपासातून अधिक सोनसाखळी चोर सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संगमनेर तालुका पोलिसांना या प्रकरणी मोठे यश मिळाले असून पोलीस उपाधीक्षक कार्यालयाकडून देखील त्यांना मोठे सहकार्य मिळत आहे.
