म्हाळुंगीनदी पुलावरील सुशोभीकरण कुंड्या पुन्हा फोडल्या !

प्रतिनिधी —

कोल्हार घोटी राज्य मार्गावरील संगमनेर शहरातून अकोले कडे जाणाऱ्या रस्त्या वरील माळुंगी नदी पुलाच्या सुशोभीकरणानंतर पुलावर ठेवण्यात आलेल्या फुलझाडांच्या ६ कुंड्या विकृत इसमांनी पुन्हा फोडल्या आहेत. या आधी सुद्धा कुंड्या फोडण्यात आल्या होत्या.

हा प्रकार विकृत इसमाने केला असल्याचे म्हटले जात असले तरी, दुसऱ्यांदा त्याठिकाणी कुंड्या फोडण्यात आल्याने हा प्रकार मुद्दाम जाणीवपूर्वक कोणीतरी विकृतीचे किडे असणाऱ्यांनी केला असावा असा संशय घेण्यास वाव आहे. वैभवशाली व सुसंस्कृत शहरात असे प्रकार निंदनीय आहेत.

संगमनेर – अकोले मार्गावर असलेल्या म्हाळूंगी नदीवरील पुलाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. संगमनेर शहरात दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर व हरित संगमनेर ही संकल्पना राबवताना अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. तसेच विविध चौका चौकांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे.

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संगमनेर हे अद्यावत वैभवशाली वाटते. त्यासाठी संपूर्ण सुसंस्कृत नागरिक संगमनेरकर सहकार्य करत असतात. मात्र काही विघातक प्रवृत्तींकडून सातत्याने चांगल्या कामाला गालबोट लावण्याचा प्रकार घडत असतो. शहरात अनेक ठिकाणी लावलेल्या झाडांना तोडण्याचे काम हे वाईट लोक करतात. तर कधी वाढत्या झाडांचे शेंडे खोडण्याचे काम करतात. दर्शनी भागामध्ये विद्रुरुपी करण करणे अशी त्यांचेउद्योग सातत्याने सुरू आहेत.

याच बरोबर आता नव्याने म्हाळूंगी नदी पुलावर उभारण्यात आलेल्या ६ सुशोभिकरण कुंड्यांची नासाडी केली आहे. यामुळे या वाईट प्रवृत्ती बदल संगमनेर शहरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही प्रवृत्ती वाढत असून ती वेळीच रोखली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक संगमनेरकर आणि पुढाकार घ्यावा आणि अशा व्यक्ती जर कुणाला आढळली तर तातडीने नगरपालिकेशी संपर्क करा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होईल काय ?

संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी गाजावाजा करीत सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली चालू करण्यात आली. महसूल मंत्र्यांनी यासाठी खूप सहकार्य केले. शहरातील घडामोडी कळण्यासाठी या यंत्रणेचा वापर होणार आहे. गुन्हेगारीवर यामुळे वचक बसेल असे चित्र सामान्य नागरिकांना दिसत होते. अशा विकृती बाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून काही शोध घेता आला तर त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!