धनादेश अनादर प्रकरणी महिलेला चार महिन्यांचा कारावास !
प्रतिनिधी —

बँकेकडून कर्ज घेऊन कर्ज नियमितपणे न भरता थकबाकीदार झाल्यानंतर बँकेला दिलेला धनादेश अपूर्ण रकमेमुळे न वटल्याने बँकेची फसवणूक केली म्हणून संगमनेर शहरातील स्पृहा कलेक्शन च्या प्रोप्रायटर मिता आशिष संवत्सरकर यांना न्यायालयाने चार महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच २ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देखील दिला आहे.

याबाबत वकील विजयानंद आर. पगारे यांनी दिलेली माहिती अशी की, युनियन बँक ऑफ इंडिया ( पूर्वीची कार्पोरेशन बँक) शाखा संगमनेर यांनी मे. स्पृहा कलेक्शन प्रोप्रायटर मिता अशिष संवत्सरकर यांना व्यवसाय साठी ७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम कर्ज दिले होती. परंतु संवत्सरकर यांनी सदर कर्जाची परतफेड केली नाही.

त्यामुळे बँकेचे थकबाकीदार झाल्यानंतर त्यांनी त्यातल्या १ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा चेक दिला. सदर चेक बँकेने वटविण्यासाठी बँकेत भरला असता सदर चेक रक्कम नाही असा शेरा मारून परत आला.
त्यानंतर कार्पोरेशन बँकेने यासंदर्भात न्यायालयात तक्रार केली. सदर केस मध्ये न्यायालयाने बँकेने दिलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश जे व्ही पखले-पुरकर यांनी आरोपी स्पृहा कलेक्शन तर्फे व करिता प्रोप्रायटर मीता आशिष संवत्सरकर यांना दोषी धरून चार महिने कारावासाची शिक्षा व कार्पोरेशन बँक शाखा संगमनेर यांना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई सात दिवसाच्या आत देण्याचा आदेश दिला आहे.

सदरची नुकसान भरपाई सात दिवसाच्या आत न भरल्यास आणखी दोन महिने कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश न्यायालयाने केलेला आहे.
कार्पोरेशन बँक, युनियन बँक इंडिया संगमनेर यांच्यातर्फे कायदेशीर सल्लागार वकील व्ही. आर. पगारे यांनी काम पाहिले तसेच त्यांना वकील किरण रोहम, पल्लवी निकाळे, सुनिता जाधव, प्रशांत बोबडे व बँकेचे विद्यमान मॅनेजर समाधान पवार यांनी सहकार्य केले.
