कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ३५० जणांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचा लाभ…
प्रतिनिधी —
कोरोनाच्या भयंकर महामारीत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३५० व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ५० हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळाला आहे. अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून मिळाली आहे.

कोरोनाच्या संकटात सातत्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे सर्वप्रथम पाठपुरावा केला.

हे अनुदान वारसांना मिळण्याकरता ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. याचबरोबर ज्यांना अद्याप पर्यंत हे अनुदान मिळाले नाही अशांकरीता वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करून ७१५ नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे. यातून ३५० नातेवाईकांना ५० हजारांचा लाभ मिळाला असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे प्रक्रिया सुरु आहे. येथे झालेल्या शिबीरावेळी अहमदनगर जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश राख, डॉ. संदीप कचेरीया, महेश वाव्हळ, पुंजाहरी दिघे यांच्यासह वैद्यकीय विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील कोरोना ने मृत झालेल्या ७१५ व्यक्तींच्या नातेवाइकांनी ऑनलाइन फॉर्म भरून सहभाग नोंदवला.
यापूर्वीही नामदार बाळासाहेब थोरात यांनी सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असून आपल्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. त्या माध्यमातून ३५० नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ झाला आहे.

कार्यालयाच्या वतीने या सर्व नातेवाईकांना पाणी,चहा, स्वतंत्र बसण्याची व्यवस्था व ऑनलाईन फॉर्म साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देते सर्वांना मायेचा आधार दिला.
यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुक्यातील जनसामान्यांच्या मदतीचे केंद्र बनले आहेत. येथे कोरोनाचे ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व नातेवाईकांचे येथील कर्मचार्यांनी केलेल्या आदरतिथ्य व प्रत्येकाला दिलेली सुविधा हे प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. या वेळी ग्रामीण भागातून आलेल्या विविध नागरिक, महिला, वृद्ध नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावी पद्धतीने आम्हा सर्वांची मदत केली आहे. मदतीला धावणारा हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून गरिबांसाठी सातत्याने काम करणारे नेते आहेत.

अजूनही ज्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानाची मदत मिळाली नाही अशा व्यक्तींनी तातडीने यशोधन कार्यालयात फार्म भरुन घ्यावा असे आवाहन इंद्रजित थोरात व महेश वाव्हळ यांनी केले आहे.
