अकोले तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल टॉवर उभे करण्यासाठी परीक्षण करण्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांचे आदेश !

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी —
अकोले तालुक्यात दुर्गम भागात मोबाईल रेंज साठी टॉवर उभे करण्यासाठी परिक्षण करावे असे आदेश दूरसंचार मंत्र्यांनी दिले आहेत.
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात मोबाईल टावर उपलब्ध नसल्याने या परिसरात मोबाईलची रेंज मिळत नाही. त्यामुळे सर्वच प्रशासकीय विभागांसह सर्व नागरिकांना एकमेकाशी जनसंपर्क ठेवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणीवर मात करण्यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार करून अकोले तालुक्यात मोबाईल टॉवर उभे करण्यात यावेत अशी मागणी केली होती.

त्याला उत्तर देताना दूरसंचार मंत्री यांनी ही बाब सकारात्मक रीत्या घेतली असून अकोले तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल टॉवर कसे उभे करता येतील याचे परीक्षण करण्याचे आदेश दिले असल्याचे लोखंडे यांना नुकतेच कळवले आहे. दुर्गम अकोले तालुक्यात विविध योजनांमुळे रस्ते वाड्या-वस्त्यांवर पोहोचले आहेत.

मात्र दूरध्वनी सेवा आणि मोबाइल सेवेची अडचण बऱ्याच ठिकाणी वाड्या-वस्त्यांवर असल्याने याठिकाणी नागरिकांना आणि प्रशासनाला देखील महत्त्वाच्या वेळी जनसंपर्क करणे अवघड होऊन बसते. विशेषतः निवडणुका, महत्त्वाच्या घटना, अभयारण्यातील घडामोडी, गिर्यारोहण करताना घडलेल्या घटना अशावेळी एकमेकांशी संपर्क होणे महत्त्वाचे असल्याने व मोबाईल रेंज मिळत नसल्याने बऱ्याच वेळा अडचणी निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

अकोले तालुक्यातील सदाहरित जंगलांमध्ये कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड अभयारण्यासह काही भाग संपूर्ण परिसर हा सदा हरितपट्टा म्हणून घोषित झालेला आहे. याठिकाणी निसर्गाला हानी पोहोचेल असे कोणतेही काम खाजगी व्यक्तींनाच काय प्रशासनाला देखील करता येत नाही. त्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. मोबाईल टॉवर मुळे पक्षांना विविध प्रकारच्या लहान मोठ्या प्राण्यांना त्रास होऊ शकतो. तसेच पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून या ठिकाणी मोबाईल टॉवर उभे करण्यास परवानगी मिळत नसे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून अपवादात्मक परिस्थिती म्हणून या भागात मोबाईल रेंज उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल टॉवरची उभारणी करावी अशी मागणी दुरसंचार मंत्रालयाकडे केली होती. मंत्रालयाने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या भागात मोबाईल टॉवर कसे उभे करता येतील याचे परीक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत.

जंगल परिसरात मोबाईल टॉवर उभे करणे अत्यंत अवघड असून त्याला शक्यतो परवानगी मिळत नाही. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी (विद्युत चुंबकीय) मूळे मानवासह प्राण्यांना आणि पक्षांना देखील त्रास होतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वादळवाऱ्यात मोबाईल टॉवर मुळे नुकसान होऊ शकते. शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते. वीज उपलब्ध नसल्यावर किंवा वीज गेल्यावर जनरेटर वापरले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रेंज येण्यासाठी अधिक क्षमता वापरावी लागते. त्यासाठी जनरेटर जेवढे जास्त क्षमतेचे तेवढे प्रदूषण जास्त असा प्रकार होतो. मोबाईल टॉवरच्या किरणोत्सारामुळे पक्षी आणि प्राण्यांना बाधा होऊ शकते. अशा व इतर अनेक समस्या असल्याने या भागात मोबाईल टॉवर उभे करण्यास परवानगी मिळेल की नाही ही साशंकता आहे.

