अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोलेत सिटूची तीव्र निदर्शने

प्रतिनिधी —
सिटू कामगार संघटना प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज अकोले पंचायत समिती येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. अंगणवाडी कर्मचारी फेडरेशन मधील विविध संघटनांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज राज्यभर निदर्शने करण्याची हाक दिली होती. यानुसार ही निदर्शने करण्यात आली.

अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. माकपच्या कार्यालयापासून मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी अकोले पंचायत समिती वर धडक दिली. आपल्या विविध मागण्यांबाबत घोषणा देत यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती अकोले येथे तीव्र निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या. सदर मागणी मान्य होत नाही तोपर्यंत किमान १५ हजार रुपये मानधनवाढ तातडीने लागू करा. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन द्या. सर्वांना अंगणवाडीच्या कामासाठी नवीन मोबाईल व मोबाईलमध्ये मराठी ॲप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या. मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुर्ण अंगणवाडी कर्मचारी म्हणून दर्जा द्या. मदतनिसांना सेविकापदी बढती बाबत निकष शिथिल करा.

पात्र सेविकांना सुपरवायझरपदी बढती द्या. अंगणवाडीची २०२१ ची उन्हाळी सुट्टी मार्च पूर्वी जाहीर करा. सेवाज्येष्ठते प्रमाणे मानधनात वाढ लागू करा. दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करा. अनेक अंगणवाडी ताईंचे गहाळ मानधन योग्य ती चौकशी करून तातडीने अदा करा. अंगणवाडी इमारतीची नवीन बांधणी व दुरूस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा. अंगणवाडी ताईंना आरोग्याच्या सोईसह संपूर्ण कुटुंबाला मोफत पाच लाखाचा आरोग्य विमा लागू करा.

कोरोना सारख्या महाभयंकर आजारात जनतेची सेवा करत असताना मृत झालेल्या अंगणवाडी ताईंना ५० लाखांची विमा भरपाई तातडीने द्या. थकीत प्रवास भत्ता, इंधन खर्च, अमृत आहार खर्च व थकीत बिल तसेच इतर देणे तातडीने अदा करा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
गणेश ताजणे, आशा घोलप, मंगल गोरे, निर्मला मांगे, रंजना पराड, रंजना साबळे, ताई म्हशाळ, रोशनी शिंगोटे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्ञानेश्वर काकड, किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले, सिटू कामगार संघटनेच्या वतीने सदाशिव साबळे व आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने संगीता साळवे यांनी मोर्चास पाठिंबा दिला.
