मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा भार सरकारने उचलावा — विखे पाटील

प्रतिनिधी —
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा भार सरकारने उचलावा अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानात बोलताना केली.
विखे पाटील यांनी छत्रपती खासदार संभाजीराजे यांची उपोषण स्थळी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संभाजीराजे आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळेच छत्रपती संभाजीराजेना उपोषण करण्याची वेळ आली. या सरकारकडून फक्त बैठकांचा फार्स सुरू आहे. बंद दाराआड चर्चा करण्यापेक्षा सरकारने ऑनलाईन चर्चा आता घेतल्या पाहीजेत आशी मागणी करून यावरूनच आरक्षणच्या बाबतीतली यांची भूमिका किती प्रामाणिक आहे हे समजेल असे मत व्यक्त केले.

आरक्षणच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रीया सुरू आहेत.जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत समाजातील विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक फी सरकारने भरावी आशी मागणी विखे पाटील यांनी केली.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक फी माफ केली.असा निर्णय कराणारी राज्यातील एकमेव संस्था असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आझाद मैदानावर राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी विखे पाटील यांनी चर्चा केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलेल्या फि सवलतीचा संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख करून विखे यांचे अभिनंदन केले.
