हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन..
SMBT हॉस्पिटल, नाशिक व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा संयुक्त पुढाकार
दूरदृश्यप्रणालीद्वारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हृदयशस्त्रक्रिया होऊ घातलेल्या चिमुकल्यांशी आणि पालकांशी साधला संवाद
प्रतिनिधी —

ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, एसएमबीटी हॉस्पिटल,घोटी, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू लहान मुलांसाठी मोफत हृदयाची 2D इको तपासणी तसेच जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबीराचा आज घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे शुभारंभ करण्यात आला.

आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे आमदार अमोल मिटकरी व सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी ज्या लहान बालकांची शस्त्रक्रिया होणार आहे अशांच्या पालकांशी संवाद साधत धीर दिला. तर उपस्थित पालकांपैकी अश्रु अनावर झालेल्या एका माउलीचे सांत्वन करताना सिने अभिनेत्री दीपाली सय्यद देखील भावुक झाल्या.

हे दोन दिवसीय आरोग्य शिबिर आज शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी व रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी नाशिक येथे होणार आहे.
या शिबिराअंतर्गत लहान मुलांची वयोगट (० ते १०) मोफत 2 डी इको कार्डिओलॉजी, मोफत कार्डिॲक सर्जरी कन्सल्टेशन, जन्मतः हृदयाला छिद्र असणाऱ्या मुलांची मोफत शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच विविध योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे.

तसेच आवश्यकता भासल्यास गरजू निर्धन रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
तरी संपूर्ण महाराष्ट्रातील गरजुंनी या विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.

सदरील उपक्रमास डॉ. हर्षल तांबे व युवा नेते सत्यजित तांबे यांचे विशेष सौजन्य लाभले. तर कार्यक्रमा प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क समनव्यक योगेश म्हस्के, प्रथमेश बेल्हेकर, एसएमबीटी हॉस्पिटलचे डॉ.योगेश दिघे, व्यवस्थापक सूरज कडलग व शिवसैनिक उपस्थित होते.

संपर्क/ नाव नोंदणी @ SMBT Hospital
मो.7720053254
मो .7720053260
