जयहिंद महिला मंचच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महिलांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा –
दुर्गाताई तांबे

प्रतिनिधी —
संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जयहिंद महिला मंचच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील व तालुक्यातील महिलांसाठी विविध आजारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक २६ फेब्रुवारी शुक्रवार ते १३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख सौदामिनी कान्हेरे व सुनीता कांदळकर यांनी दिली आहे.

जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून महिला सबलीकरण याकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या वर्षी ८ मार्च महिला दिनानिमित्त जयहिंद महिला मंच व मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

यामध्ये शनिवार २६ फेब्रुवारी रोजी मौलाना आजाद मंगल कार्यालय येथे, रविवार २७ फेब्रुवारी शारदा हायस्कूल अकोले रोड येथे, सोमवार २८ फेब्रुवारी रणजित स्पोर्ट्स क्लब मैदान येथे, मंगळवार १ मार्च सर्वोदय मंगल कार्यालय, बुधवार २ मार्च इंदिरा गार्डन नवीन नगर रोड, गुरुवार ३ मार्च क्रीडा संकुल, शुक्रवार ४ मार्च पंचायत समिती, शनिवार ५ मार्च जमजम कॉलनी, रविवार ६ मार्च पानसरे शाळा कुरण रोड, सोमवार ७ मार्च गणेश गार्डन, मंगळवार ८ मार्च राजमाता उद्यान जनता नगर, बुधवार ९ मार्च मेहर विद्यालय, गुरुवार १० मार्च मालदाड रोड, शुक्रवार ११ मार्च इंदिरानगर, रविवार १३ मार्च सह्याद्री जुनियर कॉलेज या विविध विभागांमध्ये महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया ही केल्या जाणार असून दररोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ठिकाणी हे शिबिर होणार आहे.
मौलाना आझाद मंगल कार्यालय येथे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा शुभारंभ झाला.

यावेळी बोलताना तांबे म्हणाल्या की, कुटुंबामध्ये महिला या अत्यंत महत्त्वाचा घटक असून महिला कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष करतात. आणि त्यातून रक्ताचे प्रमाण कमी होऊन इतर आजार उद्भवतात असे होऊ नये. याकरीता महिलांमध्ये आरोग्याची जाणीव जागृती व इतर आजारांची तपासणी होणे गरजेचे आहे. म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या पंधरवड्यामध्ये महिला शिबिराचे आयोजन केले आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या या शिबिरांमध्ये शहरातील व तालुक्यातील सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संतोष गोडसे 8956495979 संपर्क करावा असे आवाहन जय हिंद महिला मंच व मेडीकव्हर हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.
