संगमनेर नगरपालिकेचा दिखाऊपणा उघड…
बातम्यांसाठी फक्त ‘पत्रकबाजी’, नोटिसा बजावल्या पण कायदेशीर कारवाई शून्य !
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असलेला दिखाऊपणा आता पुरता उघड होत आहे. शहरात विविध नियमबाह्य गोष्टींवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या नगरपालिकेने केवळ प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकवण्यासाठी ‘पत्रकबाजी’चा धडाका लावला आहे. प्रत्यक्षात मात्र अतिक्रमण अवैध बांधकाम नियमबाह्य काम करणाऱ्यांना पाठीशी घालत, कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली जात नसल्याचे चित्र समोर आले आहे.
केवळ कागदी नोटिसांचा खेळ
गेल्या काही दिवसांत नगरपालिकेने अनेक थकबाकीदार, अनधिकृत बांधकाम धारक आणि अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्याच्या बातम्या मोठ्या दिमाखात प्रसिद्ध केल्या. मात्र, या नोटिसांची मुदत संपूनही प्रशासनाने पुढे पाऊल उचललेले नाही. यावरून असे स्पष्ट होते की, या नोटिसा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि ‘आम्ही काम करत आहोत’ हे दाखवण्यासाठीच काढल्या गेल्या होत्या.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी प्रसिद्धी पत्रके काढली जातात. नोटिसा बजावूनही पुढील कायदेशीर कारवाई (जसे की जप्ती, निष्कासन किंवा गुन्हे दाखल करणे) का रोखली जाते? यामागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
एकीकडे कारवाईचे कागदी घोडे नाचवले जात असताना, दुसरीकडे शहरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि अनधिकृत कामांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.
नगरपालिकेला खरोखरच शहराचा विकास आणि शिस्त हवी आहे की केवळ प्रसिद्धीच्या जोरावर वेळ मारून न्यायची आहे? जर नोटिसांवर कारवाई करायची नव्हती, तर मग हा सर्व शासकीय कागदांचा आणि वेळेचा अपव्यय कशासाठी?

