पुणे – नाशिक संगमनेर मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे…

लढणाऱ्यांची चार दिशेला चार तोंडे ! 

रेल्वे मिळवण्यासाठी एकीचा अभाव 

आमदार – खासदार – पालकमंत्री यांच्या भूमिका संभ्रमात 

आमदार सत्यजित तांबेंनी जनतेवर सोपवले आंदोलन 

जन

लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण मोबाईल मध्ये गुंतले आहेत. सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्थापन आणि महागाईला तोंड देता देता थकले आहेत. गोरगरीब शेतकरी मजूर कामगार पोटासाठी वणवण करत आहेत. तर वयस्कर मंडळी औषध उपचाराच्या विळख्यात कर्मकांडांच्या नादी लागले आहेत. श्रीमंतांना तर काही घेणे देणे नाही. आंदोलन करण्यास कोणाला वेळ आहे ? आपले भवितव्य अशा प्रकारे दुर्लक्षित केल्याने त्याचे परिणाम दिसून येतील.

 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

बहुचर्चित नाशिक – पुणे संगमनेर मार्गे होणारा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प एकदाचा बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प रद्द करून तो नव्या मार्गाने नाशिक शिर्डी अहिल्या नगर मार्गे पुणे असा मंजूर केला आहे. त्यामुळे जुन्या सरळ मार्गावर असणारे सिन्नर संगमनेर अकोले नारायणगाव खेड मंचर पुणे या भागातील नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत आणि ते संतप्त असल्याचे नेतेमंडळी सांगतात. मात्र त्याचा कुठलाही परिणाम कोणत्याही आंदोलनात दिसून येत नाही. रेल्वे मिळवण्यासाठी आंदोलन सुरू केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी आता हे आंदोलन जनतेच्या दरबारात नेऊन ठेवले आहे. तर अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांसह संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि उत्तर अहिल्यानगर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची या रेल्वे बाबतची भूमिका संभ्रमित असल्याचे चित्र आहे. रेल्वेसाठी जनता मात्र मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरताना दिसत नाही. तर रेल्वे मिळवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटना आणि नेत्यांची एकी नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चार दिशेला चार तोंडे करून आंदोलनाचे आवाज देण्यात येतात.

हा रेल्वे प्रकल्प याआधी सरळ मार्गे होणार होता. त्यासाठी जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही मिळाला होता. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन या रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्यक्ष कृती केली होती. महाराष्ट्र सरकारने देखील त्यात सहभाग नोंदवून निधीची कार्यवाही सुरू केली होती. असे सर्व असताना हा रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे न करता तो आता नवीन मार्गाने होणार असून जुना पुणे नाशिक संगमनेर मार्गे होणारा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.

त्यानंतर सिन्नर संगमनेर अकोले आणि पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी या संदर्भात हा रेल्वे मार्ग आहे त्याच मार्गाने जावा म्हणून आंदोलन करण्यासाठी मोठमोठ्या मीटिंग घेतल्या, बैठका घेतल्या. मात्र त्याचे पर्यावसन मोठ्या जन आंदोलनात झाले नाही. रेल्वेसाठी या भागातील जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली नाही. त्यांनी सरकारला जाब विचारला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्यात जनतेमध्ये उत्साह नसल्याचे दिसून आले आहे. आणि हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांची तोंडे देखील चार दिशेला वेगवेगळ्या प्रकारे वक्तव्य करत होती. विविध संघटना वेगवेगळ्या सभा आणि निषेध करीत आहेत. कोणी कोणाला विचारत नाही. आणि जनता देखील यांच्यासोबत येत नाही असाच प्रकार आता दिसून येत आहे. 

पुणे जिल्ह्यातून खासदार अमोल कोल्हे हे सुरुवातीपासून ही रेल्वे मिळवण्यासाठी सक्रिय आहेत. संगमनेर अकोले मधील नेत्यांनी रेल्वे मिळवण्यासाठी घेतलेल्या बैठकांमध्ये ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले होते. त्यांचे आंदोलन मीडिया मधून आणि केंद्र सरकारशी पत्र व्यवहारामधून सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर काही लोकांची सोशल मीडियामधून रेल्वेसाठी जोरदार लढाई सुरू आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी रेल्वे जुन्या आणि सरळ संगमनेर मार्गेच नेण्यासाठी आपली आमदारकी पणाला लागू असे वक्तव्य केले होते. मात्र आमदारकी पणाला लावण्याची संधी त्यांना मिळाली नाही. तर नुकतेच पक्ष बदल केलेले शिर्डी येथील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील या प्रकल्पासाठी काही ठोस पावले उचलली आहेत असे दिसून आले नाही. खासदार वाकचौरे आणि आमदार खताळ यांच्या भूमिका याबाबत संभ्रमित करणाऱ्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री विखे पाटील यांची देखील भूमिका याबाबत संभ्रमित करणारी असल्याचे आरोप जनतेमधून होतात. मात्र याचा जाब विचारण्यासाठी जनता रस्त्यावर उतरत नाही किंवा कुठलेही आंदोलन होत नाही. त्यामुळे आता ही रेल्वे संगमनेर मार्गे जाणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. 

अमुक तमुक बरोबर बैठका घेतल्या, चर्चा केली, निवेदन दिले, पत्रव्यवहार केला, लवकरच मीटिंग घेणार, बैठका घेऊ असा सर्व प्रकार सोशल मीडिया मधून प्रसारित केला जात आहे. त्याचा प्रत्यक्ष जन आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. यातून कुठलेही जन आंदोलन उभे राहिले नाही. कोणत्याही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले नाही. जनतेचा सहभागही त्यात राहिला नाही. जनतेचा या नेत्यांवर विश्वास आहे की नाही किंवा जनता उदासीन आहे याबाबत काहीही समजण्यास मार्ग नसून फक्त सोशल मीडियातून रेल्वे रेल्वे रेल्वे एवढा एकच गजर चालू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!