मालपाणी तंबाखू कंपनीचे प्रदूषण तात्काळ बंद करा..!
कासारा दुमाला ग्रामस्थांचे आमरण उपोषण
हवा पाणी व पर्यावरणाचे गंभीर प्रदूषण ; मानवी आरोग्यावरही होतोय परिणाम
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
प्रसिद्ध उद्योग समूह मालपाणी यांच्या तंबाखू कंपनीमुळे हवा पाणी व पर्यावरणाचे गंभीर प्रदूषण होत असून मानवी आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे हे प्रदूषण तात्काळ बंद करण्यात यावे, रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणाची तात्काळ चौकशी व्हावी, पाणी हवा व मातीचे स्वतंत्र तपासणी अहवाल जाहीर करावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कासारा दुमाला (तालुका संगमनेर) येथील ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

संपूर्ण राज्यासह देशात प्रसिद्ध असणाऱ्या मालपाणी उद्योग समूहातील तंबाखू उत्पादन हे महाराष्ट्र अतिशय प्रसिद्ध आहे. या तंबाखू उत्पादन करणाऱ्या आणि प्रक्रिया करणाऱ्या तंबाखू कंपनीमुळे कासारा दुमाला या गावच्या पंचक्रोशीत आणि शिवारात मोठ्या प्रमाणावर हवा पाणी पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. मानवी आरोग्यासह या कंपनीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आमचा श्वास वाचवा, आम्हाला नाय द्या
तसेच कंपनीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान मुले व वृद्ध व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो. उग्र वासामुळे डोळ्यांची जळजळ होते. तसेच पाण्याचे स्रोत देखील दूषित होत आहेत असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. “आमचा श्वास वाचवा, आम्हाला नाय द्या” अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या आहेत मागण्या…
ग्रामस्थांच्या वतीने हक्काच्या मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य विमा योजना तात्काळ लागू करण्यात यावी, तसेच गावात किमान पाच ते सहा ठिकाणी रियल टाईम प्रदूषण मोजणी डिजिटल डिस्प्ले बोर्ड(हवा गुणवत्ता) बसवून डेटा 24 तास सार्वजनिक करण्यात यावा, तंबाखू प्रदूषणाशी संबंधित आजारांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोफत आरोग्य योजना सुरू करावी, कंपनीशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ग्रामसभा व ग्रामपंचायतचा सहभाग कायदेशीर रित्या बंधनकारक करण्यात यावा, जिल्हा व राज्य पातळीवर नियमित आढावा बैठका सुरू करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, ग्रामस्थांवर दाखल केलेल्या सर्व खोट्या व अन्यायकारक पोलीस केसेसची चौकशी करून त्या तात्काळ मागे घेण्यात याव्यात, या केसेस व ब्लॅक लिस्टिंग मुळे झालेल्या मानसिक सामाजिक आर्थिक नुकसानीची योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, मालपाणी कंपनीत कार्यरत स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता देऊन नियुक्तीपत्र व सेवा सुरक्षिततेची हमी लेखी स्वरूपात द्यावी, कंपनीकडून झालेल्या पर्यावरणीय हानी बद्दल पर्यावरण भरपाई आकारण्यात यावी व ती रक्कम स्थानिक विकास व आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात यावी. अशा विविध मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

विशेष मागण्या…
काही विशेष मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये कंपनीकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. सदर कंपनीची तपासणी ही रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्री आठ ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अचानक सरप्राईज इन्स्पेक्शन करण्यात यावे व त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. मालपाणी तंबाखू कंपनीने सीएसआर निधीतून कासारा दुमाला गावासाठी दरवर्षी जास्तीत जास्त निधी राखून ठेवावा व त्याचा लेखी तपशील ग्रामपंचायतीला द्यावा. सीएसआर अंतर्गत केलेल्या सर्व कामांचा आर्थिक अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. सीएसआर खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात यावी.
या प्रकारच्या विविध मागण्या करण्यात आल्या असून संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालय समोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी संगमनेर यांना दिलेल्या निवेदनामध्ये कासारा दुमाला ग्रामस्थांच्या वतीने अशोक श्रीरंग काळे आणि सागर राधाकिसन वाळके यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
