संगमनेर शहरातील गांजा तस्करी – विक्रीचा प्रश्न ऐरणीवर..!
सर्वच दाखल गुन्ह्यांच्या तपासाची वरिष्ठांकडून चौकशी होण्याची गरज
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर शहरात गेल्या एक ते दीड वर्षापासून अमली पदार्थ विक्री आणि तस्करीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कधी नव्हे ते शहरात ड्रग्स विक्रीने धुमाकूळ घातलेला आहे. असे असताना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात गांजा तस्करी, गांजा विक्री याबाबत संगमनेर शहर कुप्रसिद्ध झाले आहे. गांजा संदर्भाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमधला मुद्देमाल हा कोटी रुपयांच्या रकमेचा आहे. मात्र या सर्व दाखल गुन्ह्यांच्या तपासाबाबत शाशंता व्यक्त केली जात असून वरिष्ठांनी या तपासाबाबत गांभीर्याने दखल घेऊन तपासाचीच पूर्ण चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात. कारण गुन्हे दाखल होत असले तरीही शहरातील गांजा तस्करी विक्री थांबलेली नाही. आणि पुन्हा तेच तेच आरोपी जामिनावर सुटून तेच गुन्हे करत आहेत हा संपूर्ण प्रकार संशयस्पद आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या अमली पदार्थ तस्करी बाबत विधानसभेत आवाज उठवण्यात आला. आमदार काशिनाथ दाते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. याआधी अमली पदार्थ तस्करीत पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे तपासातून समोर आले होते. जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी गांजा गर्द विक्री ऐरणीवरचा विषय आहे. संगमनेर तालुक्यात गांजा तस्करीचे विक्रीचे मोठे जाळे पसरलेले आहे. संगमनेर शहर तालुक्यातील अनेक ठिकाणी कारवायात झाल्या आहेत. वरिष्ठांच्या पथकांनीही विविध कारवाया केल्या आहेत. मात्र या दाखल गुन्ह्यांच्या तपासात पुढे कुठलीच प्रगती झालेली दिसत नसून अनेक आरोपी जामीनावर सुटले आहेत. तर “पुन्हा तेच तेच आरोपी तोच गुन्हा करत असल्याचे समोर आले आहे”. त्यामुळे या तपास करणाऱ्या यंत्रणेवर आणि अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून तपासात जाणून बुजून हलगर्जीपणा केल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर उपविभागातील संगमनेर शहर, तालुका ग्रामीण, घारगाव आणि आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक वेळा अमली पदार्थ तस्करी, विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वच गुन्ह्यांची विशेषत: या गुन्ह्यात झालेल्या तपासाची वरिष्ठ यंत्रणेकडून चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत यातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. अशा गुन्ह्यांमधल्या सराईत गुन्हेगारांना नेहमीच जामीन मिळत असून तेच गुन्हेगार तोच गुन्हा पुन्हा पुन्हा करीत असल्याचे देखील समोर आले आहे. न्यायालयात या आरोपींना मदत होईल अशी वागणूक तपास अधिकाऱ्यांची असल्याचे काही वकिलांचे म्हणणे असून तपासात त्रुटी ठेवल्यामुळे सराईत गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो अशाही प्रतिक्रिया काही वकील व्यक्त करतात.

संगमनेर शहरात तर गेल्या वर्षभरात ड्रग्स तस्करी, विक्री, गांजा, गर्द, हेरॉईन याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. कोट्यावधी रुपयाचा माल सापडला आहे. आरोपीही मिळाले आहेत. काही आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. यातील काही आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. या सर्वच तपासाच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संगमनेर तालुक्या बाहेरील पथकांनी छापे मारून दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देखील तपासात पुढे काय झाले याबाबतची माहिती लपवण्यात येते. हे सर्व आरोपींना वाचविण्यासाठीच होते काय असा ही सवाल उपस्थित झाला आहे. संबंधित तपास यंत्रणा तपास अधिकारी सखोल तपास करीत नसल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणांचे पुढे काय होते ? आरोपी कसे सुटतात ? आणि पुन्हा तेच आरोपी गुन्हे कसे करतात ? याबाबत नागरिकही साशंकता व्यक्त करीत आहेत. या संदर्भात अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने दखल घेऊन संशयित गुन्ह्यांमधील तपासा बाबतची माहिती घ्यावी व यात पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटींबाबत चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
