कोरोनामध्ये निराधार झालेल्या भगिनींना रोटरी व बूब परिवाराचा मदतीचा हात !
१११ आटा चक्कीचे वितरण
उपक्रम देवत्वाची प्रचिती देणारा —
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी —
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ संगमनेर व त्यांच्या कार्याला नेहमी पाठबळ देणाऱ्या श्री व श्रीमती रामानारायणजी बूब मेमोरिअल ट्रस्टमार्फत घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या १११ महिलांना मोफत आटा चक्कीचे वाटप करण्यात आले.
रोटरी व बूब परीवाचा हा उपक्रम देवत्वाची प्रचिती देणारा आहे असे भावपूर्ण उद्गार प्रमुख अतिथी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी प्रांतपाल ओमप्रकाश पवळे, ट्रस्टचे विश्वस्त कृष्णकुमार बूब, आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरीचे उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी, तहसिलदार अमोल निकम, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, सेक्रेटरी हृषिकेश मोंढे, प्रकल्पप्रमुख मधुसुदन करवा आदि मान्यवर उपस्थित होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृष्णकुमार बूब व परिवाराचे तसेच निराधार कुटूंबाना रोटरी क्लबने जो आधार दिला त्याबद्दल रोटरी क्लब, संगमनेरचे आभार मानले. रोटरी क्लब तसेच आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून संगमनेरमध्ये मोठे काम उभे राहत आहे त्यांना मनाने श्रीमंत असलेला बूब परिवार मदत करत आहे याचा अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

आमदार डॉक्टर तांबे यांनी रोटरी आय केअर हॉस्पिटल व रोटरी क्लब यांच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी उपस्थित महिलांना रोटरी क्लबने केलेल्या मदतीचे महत्व समजावून सांगत याद्वारे मोठा व्यवसाय कसा उभा केला जाऊ शकतो याची माहिती दिली.

उद्योजक राजेश मालपाणी यांनी रोटरीने याआधी वितरीत केलेल्या ६५ शिलाई मिशन प्रकल्पाचा आपल्या भाषणात मागोवा घेतला. आटा चक्की व शिलाई मशीन प्रकल्पांद्वारे रोटरी या कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन निर्माण करुन देत आहे, हे समाजासाठी खूप मोठे काम आहे. कृष्णकुमार बूब हे व परिवार या रथाचे सारथी आहेत तर रोटरी क्लब अर्जुन आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले.

ट्रस्टचे विश्वस्त कृष्णकुमार बूब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, १९९२ साली स्थापन झालेल्या ट्रस्टबद्दल माहिती सांगितली तसेच ट्रस्टमार्फत शिक्षण, जलसंधारण, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांचा आढावा घेतला. राज्यातील ५० पेक्षा जास्त शाळांना विविध प्रकारे कशी मदत केली याचा आढावा घेतला. बूब परिवाराची व्यवसायातील प्रगतीची माहिती त्यांनी यावेळी सांगितली. या प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगतांना उद्योजक कृष्णकुमार बूब यांनी रोटरीच्या कामाची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या काळात रोटरीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना हातभार लावण्याचे आश्वासन दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांनी हे मशीन अतिशय कमी दरात उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडाख मशिनरी, संगमनेर व चंडक मशिनरी ट्रेडर्स यांचे आभार मानले. तसेच माझ्याकडे असेलेल्या ९३ क्लबमधून संगमनेर क्लबचे काम सर्वात चांगले असल्याचे कौतुक केले. बूब परिवाराने खूप पवित्र काम केले आहे, सेवा किंवा दान करण्यासाठी खूप मोठे मन लागते त्याबद्दल त्यांनी परिवाराचे अभिनंदन केले. महसूलमंत्र्यांचे लातूरशी असलेल्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
यावेळी देण्यात आलेल्या सर्व मशीन या लाभार्थींना घरपोहच केल्या जाणार असून त्यांना त्याठिकाणी वीजजोडणीसाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री मोफत देण्यात येणार आहे तसेच मशीन कशी चालवावी याचे प्रात्यक्षिकही घरी दिली जाईल, अशी माहिती प्रकल्प समन्वयक विवेक नावंदर व आनंद हासे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल कडलग व समीर शाह यांनी केले तर आभार पवनकुमार वर्मा यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप कोकणे, दिपक मणियार, अजित काकडे, संजय राठी, खजिनदार मयुर मेहता, सुनिल घुले, मोहित मंडलीक, अण्णासाहेब शेलकर, संजय कर्पे, योगेश बारड, संकेत काजळे, ओम इंदाणी व इतर सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.
