अत्याधुनिक सुविधांमधून संगमनेर शहर अधिक ‘हायटेक’ होणार — महसूल मंत्री थोरात

शहरात आता फ्री वाय फाय झोन होणार
दुसऱ्या टप्प्यात फेस रीडिंगचे आणखी ६० आधुनिक कॅमेरे लागणार
सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक प्रणाली व कंट्रोल रूमचे लोकार्पण संपन्न
प्रतिनिधी —
सततच्या पायाभूत विकास कामांमधून संगमनेर शहर हे राज्यात अग्रगण्य ठरले आहे. येत्या काळात संगमनेर शहरात फ्री वाय फाय झोन, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प, नवीन पोलीस स्टेशन, शहरातील मुख्य चार रस्त्यांचे चौपदरीकरण तसेच पुढील टप्प्यात ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्या बरोबर अत्याधुनिक बदलांसह संगमनेर शहर अधिक हायटेक होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर शहरात ३९ सीसीटीव्ही कॅमेरा व कंट्रोलरूमचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, सभापती सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, नवनाथ अरगडे, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, प्रमिला अभंग, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, ॲड. सुहास आहेर, ढोले गुरुजी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, साईटेक कार्पोरेशनच्या काजल राऊत, नुरमोहम्मद शेख, नितीन अभंग, किशोर टोकसे, जावेद शेख यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संगमनेर शहर पोलिस स्टेशन मधील अत्याधुनिक कंट्रोल रूमचा लोकार्पण आणि शहरातील संगमनेर बस स्थानक, तीन बत्ती चौक व माळीवाडा येथील ३ पी टू झेड कॅमेर्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटानंतर संगमनेर तालुक्यात सातत्याने निधी मिळून विकासकामांचा वेग कायम आहे. संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, प्रांताधिकारी कार्यालय, कोर्ट इमारत, नगरपालिका इमारत, क्रीडासंकुल अशा अत्याधुनिक इमारती उभ्या राहिल्या आहेत. स्वच्छ व मुबलक पाणी, बंदिस्त गटार व्यवस्था, गार्डन, विविध रस्त्यांची कामे यामुळे संगमनेर शहराचे वातावरण हे अधिक चांगले झाले आहे. समता, बंधुभाव यामुळे येथे प्रत्येक नागरिकास राहण्यास प्राधान्य आहे. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरीत संगमनेर या संकल्पनेमुळे स्वच्छतेसह संगमनेर मध्ये हिरवाई वाढली आहे. संगमनेर शहरात येणारे चारही बाजूचे रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरण होणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक या रस्त्यांमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. हा रस्ता स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प हा अभिनव उपक्रम म्हणून राबवला जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात संगमनेर शहरात नव्याने ६० कॅमेरे फेस डिटेक्शनच्या क्वॉलिटीचे बसवण्यात येणार आहेत. तसेच आगामी काळात नवीन पोलीस स्टेशन सह अत्याधुनिक पोलीस कर्मचारी वसाहत निर्माण केली जाणार आहे. शहरातील व्यापारी बांधवांनी ही आपल्या दुकानाचे आतील भागाप्रमाणे दुकानाच्या बाहेर ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे सांगताना आगामी काळात अत्याधुनिक बदलांमुळे संगमनेर शहर हायटेक होणार असल्याचे ते म्हणाले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा म्हणजे हे टेहाळणी बुरुज आहेत. यामुळे संगमनेरातील प्रत्येक गोष्टींवर नजर असणार आहे. पोलिसांचा ताण कमी होणार आहे. संगमनेरमध्ये खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असून जास्त महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. महिला – भगिनी, विद्यार्थी – विद्यार्थिनी या सर्वांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यातील पहिली अद्यावत प्रणाली थोरात यांनी याठिकाणी बसवली असून नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचे काम केले जात आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, मुंबई पुणे नागपूर या मेट्रो शहरांप्रमाणे संगमनेर मध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हायटेक सीसीटीव्ही सुरक्षारक्षक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागरिकांची जागृकता जास्त असल्याने गुन्ह्यांची रिपोर्ट जास्त होत आहे. जनतेला मदत करणे हे पोलिसांचे काम असून जिल्ह्यातील सर्वात चांगली यंत्रणा संगमनेरमध्ये थोरात यांनी सुरू केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा यामुळे नियंत्रण करणे सोपे जाणार असून पोलिस प्रशासनाच्या कामाला आणखी बळकटी मिळणार आहे. या नव्या प्रणालीसह पोलीस प्रशासन अधिक चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे स्वागत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले. प्रास्ताविक दुर्गाताई तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले.

स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पाअंतर्गत फ्री वाय फाय झोन
संगमनेर शहरात अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार असून बसस्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज यादरम्यानच्या चौपदरीकरण रस्त्याचे सुशोभीकरणा बरोबर या रस्त्याच्या डीवाईडर मध्ये ऑप्टिकल केबल द्वारे फ्री वायफाय झोन ची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर शहरात विविध ठिकाणी वाय-फाय झोन असणार आहेत.
