घुलेवाडी जलजीवन योजनेची निधी वाढ संशयास्पद : चौकशीची मागणी
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे १० कोटींचे वीज बिल माफ करा
आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष वेधले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील घुलेवाडी गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेच्या खर्चात झालेल्या मोठ्या वाढीची सखोल चौकशी करावी, तसेच तळेगाव दिघे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे १० कोटी रुपयांचे थकीत वीज बिल माफ करावे किंवा विशेष सवलत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात केली. या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे त्यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष वेधले.

या संदर्भात खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार खताळ यांनी, घुलेवाडी येथील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेची सुरुवातीची अंदाजित किंमत ८१ कोटी रुपये होती. मात्र सध्या या योजनेचा खर्च वाढून तो १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रस्तावित निधीतील ही मोठी वाढ संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. काही ठराविक राजकीय पक्षाशी संबंधित ठेकेदारांनाच कामे देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी सभागृहात केला.

याशिवाय घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, जवळे कडलग, साकूर, निमगाव भोजापूर आणि अकलापूर या गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित योजनांच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत नसतानाही तळेगाव दिघे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर तब्बल १० कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शासनाने या थकीत वीज बिलाची माफी करावी किंवा त्यात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी करत या महत्त्वाच्या प्रश्नांकडे विधिमंडळाचे लक्ष वेधले.


