संगमनेर शहरात लागू होणार नवीन नियम…!

नगराध्यक्षांसह प्रशासन ॲक्शन मोडवर 

शहर सुव्यवस्थेसाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा – डॉ. मैथिली तांबे 

संगमनेर प्रतिनिधी —

शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने संगमनेर नगरपालिकेमार्फत विविध नियमांची दिनांक 01 मार्च 2026 पासून प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली. तसेच शहराच्या सुव्यवस्थेसाठी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक यांनी मनापासून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील वाढती वाहतूक आणि गर्दी लक्षात घेता सार्वजनिक रस्ते व फुटपाथ मोकळे राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे दुकानांसमोरील अनधिकृत ओटे, शेड व फलक स्वयंस्फूर्तीने काढून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, यात सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

स्वच्छ संगमनेरच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ओला व सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले.

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी हॉस्पिटल, मोठी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांनी स्वतःची पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच शहराचे सौंदर्य आणि नियोजन अबाधित ठेवण्यासाठी परवानगीशिवाय बांधकामे, बॅनर किंवा पोस्टर्स लावू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यावर किंवा चौकात व्यवसाय करणाऱ्या भाजी-फळ विक्रेते, पान टपरी, चहा टपरी आदी विक्रेत्यांनी विनापरवाना व्यवसाय करू नये. हॉकर्स झोनच्या नियमांनुसार ओळखपत्र लावणे अनिवार्य असून नियमांचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते. असा इशाराही देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!