पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला ते स्पष्ट करावे — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर | प्रतिनिधी —

पालकमंत्री नाशिक – पुणे रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटल्याचे कळाले. आम्हाला आनंदच आहे. मात्र त्यांनी तीन पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा मंत्री महोदयांना दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशा शब्दांत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट सवाल केला आहे.

संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विशेषतः 2020 नंतर गती देण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये सेंट्रल रेल्वेकडून डीपीआर मंजूर झाला होता. त्यानुसार नाशिक – सिन्नर – संगमनेर – साकूर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरुनगर – चाकण – आळंदी – हडपसर – पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्या उपस्थितीत आणि साक्षीने झालेली आहे. सरकारने साडेतीनशे कोटी रुपये मोघम वाटले का ? जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते, तेव्हा या सर्व अडचणींचा सारासार विचार झालेला होता. त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते. मग अचानक सरकार बदलल्यानंतर जीएमआरटी का आठवली? मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. आज जी कारणे सांगितली जात आहेत, त्या कारणांचा विचार केल्यानंतरच सेंट्रल रेल्वेने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. त्यातूनच नाशिक – पुणे रेल्वे सरळ मार्गे होणार होती.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री रेल्वेमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता मार्ग सुचवला ? आत्ता आपल्यासमोर तीन मार्ग आहेत. दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुका येथील आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे. पालकमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवला आणि चर्चा केली, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. ते नेमक्या कोणत्या मार्गाचा पाठपुरावा करत आहेत, त्याचा नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेला द्यावा, जेणेकरून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होतील. संगमनेरची रेल्वे ही येथील जनतेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. आज निर्णय झाला नाही तर पुढील पन्नास वर्षे हा प्रकल्प होणार नाही; त्यामुळे मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.

मूळ मार्गाने रेल्वे ही सर्वांच्याच फायद्याची

मुंबई – नाशिक – पुणे हा गोल्डन ट्रँगल आहे. सर्वात जास्त उद्योग, रोजगार आणि लोकसंख्या असलेला हा भाग आहे. नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही इथल्या व्यापाराची, शेतीची आणि समाजाचीही गरज आहे. सरळ मार्ग तयार करण्याऐवजी वाकडी वाट इथल्या विकासाला परवडणारी नाही.

रेल्वे हा राजकारणाचा नाही, भविष्याचा विषय

रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची वेळ नाही. सर्वांनाच माहिती आहे की रेल्वे आत्ता झाली तरच होईल; नाहीतर पुढे 100 वर्षे ती होईल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे राजकारण करण्याची ही वेळ नाही आणि हा विषयही राजकारणाचा नसून या परिसराच्या भविष्याचा विषय आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!