नगरपालिकेचा 2.0 प्रोग्राम “हास्य जत्रा” व्हायला नको…!

गरिबांवर हातोडा ; वशिल्यावाले जैसे थे !!

 विशेष प्रतिनिधी —

 नव्याने सत्तेत आलेल्या सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील अतिक्रमण हटाव मोहीम, त्यात होणारी वशिलेबाजी आणि फक्त गरिबांवरच पडणारा हातोडा व काही कालावधीनंतर शहरात अतिक्रमणाची पुन्हा जैसे थे परिस्थिती यामुळे 2.0 चा प्रोग्राम “हास्य जत्रा” व्हायला नको अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक आणि सेवा समितीला भरभरून मतदान केलेल्या मतदारांकडून व्यक्त होत आहे. संगमनेरकरांचा विश्वासघात व्हायला नको असाही सूर उमटत आहे. 

ठरल्याप्रमाणे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली. नेहमीप्रमाणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांच्या, राजकारण्यांच्या आणि काही नगरसेवकांच्या डोळ्यात खुपणारा नवीन नगर रोड सर्वात प्रथम टार्गेट करून गोरगरिबांच्या हातगाड्यांवर जेसीबीचा पंजा उगारून कारवाई करण्यात आली. मात्र सिमेंट काँक्रीट ने पक्की बांधकामे करून, पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून, बांधकाम करून, बांधकामाचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या वशिलेबाजांवर, व्यापाऱ्यांवर, अनेक हॉस्पिटल्स, व्यापारी गाळे, धंदेवाईकांवर, श्रीमंतांवर कारवाई करण्यास कानाडोळा करण्यात आल्याचे चित्र पहिल्याच दिवशीच्या मोहिमेत समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकारांकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘सर्वांना समान न्याय’ हे तत्व गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र पहिल्या दिवशी तरी दिसत होते.

नेहमीप्रमाणे नवीन नगर रोड, बस स्थानक परिसर, बस स्थानक ते बी एड कॉलेज पर्यंत जाणारा रस्ता, बस स्थानक ते कॉलेज पर्यंत जाणारा फुटपाथ, हातगाड्या, भाजीविक्रेते, फळ विक्रेते या सर्वसामान्यांवर आणि हातावर पोट भरणाऱ्यांवर कारवाई झाली. मात्र ज्यांच्यापासून रस्त्याला अडचण होते अशी अवैध अतिक्रमित बांधकामे, व्यापारी इमारती, हॉस्पिटल्स, अवैध रिक्षा थांबे, अवैध पार्किंग यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. कारवाईचा हा पहिलाच दिवस असल्याने येथून पुढील काळात सर्वांवरच कारवाई होईल अशी अपेक्षा असली तरी ही सुरुवातच चांगली नसल्याने आणि पक्षपाती स्वरूपाची असल्याने नागरिकांच्या मनात कारवाई विषयी विविध शंका उपस्थित होत आहेत.

नगरपालिका प्रशासनाची चुप्पी –

चार वर्षांपासून प्रशासन राज असल्याने आणि शहराशी काहीही घेणे देणे नसलेले अधिकारी नगरपालिकेतील खुर्च्यांवर बसलेले असल्याने सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. शहराचे काहीही वाटोळे झाले तरी आम्हाला काही घेणे देणे नाही अशा मानसिकतेचे अधिकारी व कर्मचारी नगरपालिकेत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच दोन आमदारांच्या राजकीय भांडणाचा फायदा – गैरफायदा अधिकारी उचलत असल्याचे देखील दोन्हीकडचे कार्यकर्ते व पदाधिकारी सांगतात. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये ‘माजोरडापणा’ आला असल्याचे देखील आरोप होत आहेत. यापूर्वीही नगरपालिकेच्या प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम नेहमीच फार्स ठरल्या आहेत. आजही ही मोहीम सुरू झाल्यानंतर नगरपालिकेकडून माध्यमांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. दोघा नेत्यांच्या भांडणात जनतेचा काटा काढण्याचे काम अधिकारी करत नाहीत ना असा सवाल उपस्थित झाला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!