‘चला गांधींवर प्रेम करूया’ जयहिंदचा अभिनव उपक्रम !
गांधीजींचे विचार गावोगावी पोहोचून सशक्त देश निर्मितीचे कार्य हाती.

प्रतिनिधी —
सर्वसामान्य नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचून देशात व जगात शांतता निर्माण होऊन विकासातून समृद्धता घडवण्यासाठी ‘चला गांधींवर प्रेम करूया’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त संगमनेर तालुक्यात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गावोगावी ‘व्हॅलेंटाईन डे विथ गांधीज थॉट’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे , दुर्गाताई तांबे, संकेत मुनोत यांसह जयहिंद लोकचळवळीचे विविध कार्यकर्ते यांनी खेडोपाडी नागरिक, युवक, विद्यार्थी यांच्या समवेत संवाद साधून गांधीजींचा विचार पोहोचविला.

निरोगी व निकोप समाज निर्मितीचे कार्य हाती घेतलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने मागील २२ वर्षांमध्ये समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, विज्ञानाधिष्ठित व पुरोगामी विचार ,स्वच्छ व सुंदर गाव असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांनी स्वीकारले असून यामुळे जगामध्ये शांतता नांदत आहे .ज्यामुळे जगामध्ये अशांतता निर्माण होते त्या त्या वेळेस गांधीजींचे विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. यातूनच बराक ओबामा, नेल्सन मंडेला यांचेसह विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम व्यक्तींनी आपल्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित केली आहे.

भारतामध्ये काही जातीयवादी शक्ती तेढ निर्माण करू पाहत आहे अशा अस्थिर परिस्थितीमध्ये गांधींचे विचार हेच प्रेरक आहेत. सत्य, अहिंसा, सर्वांना बरोबर घेऊन जाणे ,खेड्यांचा विकास ,अंधश्रद्धा निर्मूलन याचबरोबर सर्वांशी प्रेमाने वागणे हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. त्या विचारांची आज नितांत गरज असून जाती-धर्माच्या नावावर तरुणांची डोके भडकवली जात आहे. यामुळे सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे .
सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी तरूणांमध्ये पेरल्या जात आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. गांधींचे विचार हे तरुणांमध्ये रुजवण्याचे काम जय हिंद लोक चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी, वेल्हाळे ,पेमगिरी ,नांदुरी दुमाला देवकौठे यांसह १५ गावांमध्ये व्हॅलेंटाईन डे विथ महात्मा गांधी थॉट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम यापुढे सुरू राहणार आहे.
संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयहिंद लोक चळवळीच्या वतीने गांधीजींचे विचार पोचविण्याचे काम हाती घेण्यात येणार असून चला गांधींवर प्रेम करूया हा एक अभिनव उपक्रम सोशल मीडिया च्या जमान्यात माणसे जोडण्याचे काम करणार असल्याचे आमदार डॉ तांबे यांनी सांगितले आहे.

Excellent article! We will be linking to this particularly great post on our website. Keep up the good writing.