वाळू तस्करांवर कारवाई ; काहींच्या पोटात दुखू लागले…..

आमदार अमोल खताळ यांचा विरोधकांना टोला

संगमनेर | प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली होती. मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असताना त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. मात्र मी आमदार झाल्यानंतर अवैध वाळू उपशा आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच काहींच्या पोटात दुखू लागले असून आता ते माझी उघडपणे बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप आमदार खताळ यांनी केला आहे.

आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशः नंगानाच घातला होता. प्रवरा व मुळा या दोन्ही नद्यांमधून कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते बिनधास्तपणे अवैधरित्या वाळू उपसा करत होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. चोरी करायची आणि वरून शिरजोरपणा दाखवायचा, अशीच अवस्था त्या काळात होती. त्यांच्या काळात मोठ्या आणि अवजड वाहनांद्वारे वाळूची खुलेआम वाहतूक करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्ते अक्षरशः खराब झाले. सर्वाधिक वाळू उपसा त्यांच्या काळात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाला असल्याचा आरोपही आमदार खताळ यांनी केला आहे. मात्र आपण आमदार झाल्यानंतर अवैध वाळू वाहतुकीला खऱ्या अर्थाने चाप बसला असून सातत्याने वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार खताळ यांनी पुढे सांगितले की, आज तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब घरकुलधारकांना शासनाच्या माध्यमातून मोफत वाळू उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र काही लोक जाणूनबुजून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी बदनामी करत आहेत. यापूर्वी वाळू तस्करांना कोणाचे संरक्षण होते, हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे. आता कामधंदा उरला नसल्याने फक्त बदनामी करून ‘आमच्या काळात तालुका शांत होता’ असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

“मी आधीच महसूल आणि पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, वाळू तस्कर हा कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हे सांगण्याचे धाडस आमच्यात आहे. तुमच्या काळात वाळू तस्करांना अभय दिले जात होते, तर आमच्या काळात गोरगरीब घरकुलधारकांना मोफत वाळू मिळत आहे. हाच खरा फरक आहे. मात्र तोही तुम्हाला पाहवत नाही.”

— अमोल खताळ, आमदार – संगमनेर

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!