ज्यांचा निळवंडे धरण व कालव्यांमध्ये संबंध नाही ते लोक पत्रकबाजी करत आहेत..
नवीन लोकप्रतिनिधींच्या पाण्याबाबत नुसत्या भूलथापा — संपतराव गोडगे
गाजावाजा केलेले पिंपळ्याचे पाणी फक्त कागदावरच…
संगमनेर | प्रतिनिधी –
उत्तर नगर जिल्ह्यातील 182 गावांना पाणी मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरणासह डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. मात्र या कामांमध्ये कोणतेही योगदान नसणारे किंबहुना ज्यांना गावे माहीत नाही आणि लाभक्षेत्रही माहीत नाही असे नवीन लोकप्रतिनिधी पाण्याबाबत खोटी माहिती देऊन बनवाबनवी करत असल्याची टीका संपतराव गोडगे यांनी केली आहे.

चिंचोली गुरव व तळेगाव दिघे येथे कार्यकर्त्यांशी बोलताना संपतराव गोडगे म्हणाले की, नवीन लोकप्रतिनिधीला अजून डावा आणि उजवा कालवा सुद्धा माहित नाही, किंवा त्या लाभ क्षेत्रात येणारी गावे सुद्धा माहिती नाहीत. या कालव्यांसाठी आणि धरणासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांना पाणी देण्यासाठी त्यांनी योजना आखली आहे. याचबरोबर कालव्याच्या वरील गावांना सुद्धा पाणी देता येईल याकरता आराखडा तयार केला आहे. निमोण – नान्नज दुमाला या गावांसाठी उपसा जलसिंचन योजना मंजूर केले आहेत. मात्र महायुती सरकार आल्यानंतर या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या गेल्या.

चिंचोली गुरव शिवारातील सर्व क्षेत्र निळवंडे लाभक्षेत्रात नियोजित होते, मात्र महायुती सरकार आल्यानंतर 300 हेक्टर जमीन वगळली गेली. याला जबाबदार नवीन सरकार आहे. ही जमीन वगळल्यानंतर सर्व शेतकरी व नागरिकांनी थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या जमिनीचा समावेश सुद्धा केला.

तोपर्यंत नवीन लोकप्रतिनिधीला चिंचोली गुरव किंवा हा शिवार सुद्धा माहिती नव्हता. पाण्याबाबत खोटी माहिती देऊन जनतेमध्ये भूलथापा देण्याचा प्रयत्न नवीन लोकप्रतिनिधी करत असून खरे तर त्यांनी मागील दीड वर्षांमध्ये केलेले एक काम दाखवावे आणि मग बोलावे. नवीन कामांसाठी नवीन निधी आणावा मात्र तसे काही होत नाही. थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नवीन लोकप्रतिनिधी करत असल्याची टीका गोडगे यांनी केली असून जनतेला त्यांची बनवाबनवी चांगली माहित झाली आहे असे ते म्हणाले.

नवीन लोकप्रतिनिधीने गाजावाजा केलेले पिंपळ्याचे पाणी फक्त कागदावरच
नवीन लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पिंपळे येथील बंधाऱ्यातून पारेगाव बुद्रुक व चिंचोली गुरव गावासाठी पाणी सोडले अशी मोठी पत्रक बाजी केली. वस्तुस्थिती मध्ये हे पाणी आलेच नाही. हे पाणी फक्त कागदावरच राहिले. खोटी पत्रक बाजी करणे आणि जनतेला भुलथापा देणे हा यांचा उद्योग असल्याची घाणाघाती टीका माजी उपसभापती अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, विलास सोनवणे यांच्यासह चिंचोली गुरव ग्रामस्थांनी केली आहे. याचबरोबर काही लोक लगेच पत्रकबाजी करतील मात्र त्यांनी पिंपळेचे पाणी गावात आणावे आणि मग बोलावे असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
