आशा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा टाकने बंद करा –
सिटू कामगार संघटनेची संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी

प्रतिनिधी —
अत्यल्प मोबदल्यावर काम करत असणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांवर संगमनेर तालुक्यात अतिरिक्त कामाचा बोजा टाकण्यात येत आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत समाविष्ट नसलेल्या कामांची जबाबदारीही आशा कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येत आहे. ज्या कामाचा मोबदला मिळत नाही अशी कामे यापुढे आशा कर्मचाऱ्यांवर टाकू नयेत अशी मागणी करण्यासाठी व आजवरचे सर्व थकीत मानधन आशा कर्मचाऱ्यांना तातडीने द्यावे, आशांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा प्रमुख मागण्या प्रशासना पर्यंत पोहोचविण्यासाठी आज सिटू प्रणित जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांची संगमनेर पंचायत समिती येथे भेट घेतली.

आशा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी संबंधित सर्व अधिकारी व सिटूच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्न सोडविण्यासाठी दोन तास बैठक चालू होती.
कुष्ठरोग सर्वेक्षणाचे मानधन तातडीने देण्यात यावे क्षयरोग निदानासाठी आवश्यक नमुने सक्तीने आशांकडून जमा करून घेणे तातडीने थांबवावे, प्रवास भत्ता न देता वारंवार बैठकीसाठी बोलवणे थांबवावे, बाह्य रुग्ण विभाग तसेच प्रसूती साठीची पूर्वतयारी ही आशांची कामे नसतानाही त्यांच्याकडून ही कामे करून घेतली जात आहेत. ज्या कामाचा मोबदला मिळत नाही अशी कोणतीही कामे आशांवर लादू नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संगमनेर पंचायत समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांनी या संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी शिष्टमंडळाबरोबर दोन तास सविस्तर चर्चा केली. बैठकीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, नंदू गवांदे, सिटू कामगार संघटनेच्या संगीता साळवे, सुनिता गजे, वैशाली सुरसे, निर्मला पवार, सुनंदा कोल्हे, चित्रा डगळे, वंदना बांगर व संगमनेर तालुक्यातील आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

